पालावरची शाळा अचानक बेपत्ता
By Admin | Updated: December 19, 2015 00:51 IST2015-12-19T00:51:54+5:302015-12-19T00:51:54+5:30
पिढ्यान्पिढ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांच्या मुलांसाठी वरोरा शिक्षण विभागाने मोठ्या प्रयत्नाने शिक्षणाची द्वारे उघडून पालावरची शाळा एक महिन्यापूर्वी वरोरा शहरानजीक सुरू केली.

पालावरची शाळा अचानक बेपत्ता
शिक्षक हिरमुसले : भटकंती करणाऱ्यांच्या मुलांसाठी सुरू होती शाळा
वरोरा : पिढ्यान्पिढ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांच्या मुलांसाठी वरोरा शिक्षण विभागाने मोठ्या प्रयत्नाने शिक्षणाची द्वारे उघडून पालावरची शाळा एक महिन्यापूर्वी वरोरा शहरानजीक सुरू केली. एक महिन्यापासून शाळा नियमित सुरू असल्याने शाळेतील विद्यार्थी शिक्षणात चांगले रमले. मात्र शाळेतील विद्यार्थी आपल्या कुटुंबासह अचानक बेपत्ता झाल्याने पालावरची शाळा आता कायमची बंद झाली आहे.
नेहमीप्रमाणे शिक्षक शाळेत गेले असता विद्यार्थी व शाळेसाठी उभारलेल्या पालही दिसेनासा झाल्याने महिनाभर विद्यार्थ्यांसोबत रमणारे शिक्षकही नाराज होवून परत गेले.
दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात नागपूर-चंद्रपूर मार्गालगत वरोरा शहरानजीक जडीबुटी विकणारी २५ कुटुंब येवून झोपड्या उभारुन राहू लागले. झोपडीमधील पुरुष मंडळी दिवसभर शहरात जडीबुटी विकायचे तर स्त्रीया व मुले झोपडी परिसरात राहायचे. या झोपड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलंमुली असल्याने ते शाळाबाह्य राहू नये, याकरीता वरोरा शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आर.आर. चव्हाण व त्यांचे सहकारी तसेच जि.प. सदस्य नितीन मत्ते यांनी पुढाकार घेत झोपडीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांशी जवळीकता साधली. त्यांना विश्वासात घेण्याकरीता दिवसाळीच्या दिवसात वरोरा शहरात फिरुन फराळाचे साहित्य गोळा करुन त्यांना वाटले. विश्वास संपादन झाल्यावर इथली मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरीता नियोजन करुन १४ नोव्हेंबरपासून ५२ विद्यार्थी संख्या असलेली पालावरची शाळा सुरू करण्यात आली. प्रारंभी शाळा झोपडी वजा घरात घेण्यात आल्यानंतर पालक उत्साही झाले. त्यांनी वेगळा पाल उभा करुन दिला.
दिवाळीच्या सुट्टया असतानाही त्यांनी वेगळा पाल उभा करुन दिला. दिवाळीच्या सुट्टया असतानाही बीआरसी विषय तज्ञांनी या शाळेत नियमित वर्ग घेणे सुरू केले. शिक्षण विभाग व समाजातील दाणी व्यक्तीकडून पालावरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन शाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाने रितसर नोंदही करुन घेतली. मागील एक महिन्यापासून पालावरची शाळा नियमित सुरू असल्याने विद्यार्थी पालावरच्या शाळेतील मूल शिक्षणासोबतच इतरही कार्यक्रम शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे सादर करीत होते. ते आपली नावे पाटीवर अचूकपणे लिहित असल्याने आम्हालाही शिकवा, अशी गळ पालावरच्या महिलांनी शिक्षकांना घातली होती, हे विशेष!
५२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणात सामावून घेत पालावरची शाळा वरोरा शहरात सुरू झाल्याने अनेक तज्ञ व्यक्तींनी या शाळेला भेट दिल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी)
पूर्वसूचना न देताच निघून गेले
पिढ्यान्पिढ्या भटकंती जीवन जगत असल्याने ते शिक्षणापासून वंचित झाले. शिक्षणाची दारे वरोरा शिक्षण विभागाने उघडून देत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू झाले होते. ही कुटुंबे भटकणार याची कल्पना शिक्षण विभागाला होती. त्यामुळे त्यांच्या पालकांना तुम्ही जाताना पूर्व सूचना द्या म्हणून शिक्षक वारंवार विनंती करीत होते. परंतु, या विनंतीकडे दुर्लक्ष करीत एकाच रात्री अख्खे कुटुंब स्थालांतरीत झाले. त्यामुळे पालावरची शाळा कायमची बंद पडली. स्थानांतरीत करताना पूर्व सूचना दिली असती तर पुढील गावात त्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली असती व त्यांचे शिक्षण सुरू राहिले असते.