मोफत सेवेच्या नावावर रुग्णांची लूट
By Admin | Updated: September 21, 2014 23:48 IST2014-09-21T23:48:27+5:302014-09-21T23:48:27+5:30
शासकीय रुग्णालयामध्ये शासनामार्फत सहा महिन्यांपूर्वी नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. मात्र सदर रुग्णवाहिकेसाठी रुग्णांना १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये किराया द्यावा लागत आहे.

मोफत सेवेच्या नावावर रुग्णांची लूट
लखमापूर : शासकीय रुग्णालयामध्ये शासनामार्फत सहा महिन्यांपूर्वी नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. मात्र सदर रुग्णवाहिकेसाठी रुग्णांना १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये किराया द्यावा लागत आहे. परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर ग्रामीण रुग्णालय आणि कोरपना येथे रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. परंतु चंद्रपूर येथे रुग्णांना स्थलांतरीत करण्यासाठी एक हजार २०० ते एक हजार ४०० रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या बीपीएलधारक, दुर्बल घटकातील रुग्णांना ही सेवा मोफत असल्याचे सांगण्यात येते, तर इतर गंभीर रुग्णांसाठी ही सेवा मोफत आहे. मात्र रुग्णांच्या अवस्थेचा फायदा घेत त्यांच्याकडून अधिक पैशाची मागणी केली जात आहे.
त्यामुळे शासकीय रुग्णवाहिका नागरिकांसाठी मोफत असताना खासगी वाहनाप्रमाणेच रुग्णांना किराया द्यावा लागत आहे. या तालुक्यात बीपीएलधारकांची संख्या अधिक आहे. तसेच मोलमजुरी करुन जगणारा कामगार, शेतकरी व मजुर वर्गही आहे. खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेता येत नाही. म्हणून शासकीय रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात. यामागे चार पैशांची बचत व्हावी, शिल्लक राहावे अशी अपेक्षा असते. परंतु शासकीय रुग्णालयात अशी लूट सुरु असल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. काही रुग्णांनी याविषयी वाहन चालकाला व वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता डिझेलसाठी पैसे कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गंभीर प्रकृती असताना पैशाची पर्वा न करता काही रुग्ण मुकाट्याने हा अन्याय सहन करत आहे. याचाच फायदा घेऊन वाहन चालक रुग्णांकडून वैयक्तिक १०० ते २०० रुपये मागत असल्याचीही चर्चा आहे. शासनामार्फत रुग्णांसाठी अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये विविध आधुनिक सुविधा कोटी रुपये खर्च करुन पुरविण्यात येत आहेत. परंतु योजनांची अंमलबजावणी करणारे अधिकारी व कर्मचारी स्वार्थापोटी सामान्य माणसावर याचा भुर्दंड बसविल्या जात असल्याचे चित्र आहे.
गडचांदूर, कोरपना ग्रामीण रुग्णालयात अद्यापही एक्स-रे मशिन, रक्त तपासणी केंद्र आणि खाटांची कमतरता आहे. रुग्णांची संख्या लक्षात घेता वैद्यकीय अधिकारी कमी आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळत राहावे लागत असल्याने अकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)\