रुग्णांकडून अधिक रक्कम घेण्याची चौकशी

By Admin | Updated: August 11, 2015 01:43 IST2015-08-11T01:43:38+5:302015-08-11T01:43:38+5:30

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मागील काही दिवसांपासून रुग्णाकडून अधिकची रक्कम घेत नमूद रक्कमेची पावती दिली

Paid Amount From Investigator | रुग्णांकडून अधिक रक्कम घेण्याची चौकशी

रुग्णांकडून अधिक रक्कम घेण्याची चौकशी

वरोरा : उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मागील काही दिवसांपासून रुग्णाकडून अधिकची रक्कम घेत नमूद रक्कमेची पावती दिली जात होती. रुग्णाकडून अधिक रक्कम घेतली जात असल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर या संपूर्ण प्रकाराची ११ आॅगस्ट रोजी समिती मार्फत चौकशी करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्रान्वये आदेश दिल्याने रुग्णाकडून अधिकची रक्कम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणारे सिकलसेलग्रस्त, अपंग व इतर रुग्णाकडून शासन नियमाचे उल्लंघन करून रक्कम घेतली जात होती. हा प्रकार मागील काही महिन्यापासून सुरू होता. वरोरा तालुक्यातील दहेगाव येथील अनाथ व अपंग असलेल्या अमोल दरशथ डाहुले यांच्याकडूनही अधिकची रक्कम उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने घेतली होती. ही बाब वरोरा शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक छोटू शेख यांना कळताच त्यांनी अपंग अमोलला घेवून उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. डब्ल्यू. भगत यांची भेट घेतली. अपंग व्यक्तीकडून घेतलेली अधिकची रक्कम संबंधित कर्मचाऱ्याने परत केली. यानंतर छोटू शेख यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरीता एक समिती नेमली असून ही समिती ११ आॅगस्टला वरोरा येथे येवून संबंधिताने बयाण नोंदवून घेणार आहे. त्यानंतर समिती आपला अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांना सादर करणार आहे. यामध्ये कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर काय कारवाई होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रुग्णांकडून अधिकची रक्कम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे या चौकशी समितीमुळे तुर्तास धाबे दणाणले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Paid Amount From Investigator