भात उत्पादक शेतकरी सुखावला
By Admin | Updated: August 4, 2016 00:50 IST2016-08-04T00:50:42+5:302016-08-04T00:50:42+5:30
जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस होत असतोे.

भात उत्पादक शेतकरी सुखावला
बल्लारपूर तालुका : आतापर्यंत १०८० मिली पावसाची नोंद
बल्लारपूर : जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस होत असतोे. गतवर्षी याच महिन्यात बल्लारपूर तालुक्यात ९७९ मिलीमिटर पर्जन्यमानाची नोंद झाली आणि शेतकरी वर्गाला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र बल्लारपूर तालुक्यात जून व जुलै या दोन महिन्यातच १०८० मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पावसाळ्याच्या दुसऱ्याच महिन्यात पर्जन्यमानाने सरासरी गाठल्याने यावर्षी शेतकरी वर्गाला ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आतापासून निर्माण झाली आहे.
बल्लारपूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११३२.२१ मिली पावसाचे आहे. या तुलनेत यावर्षी तालुक्यात १०८० मिली पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. दोन महिन्यात पावसाने सरासरी पूर्ण केल्याचे दिसून येते. या पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा आहे. परंतु कापूस, सोयाबीन, तूर व अन्य कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान करणारा पाऊस ठरला आहे. बल्लारपूर तालुक्यात ९ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र खरीपाच्या पिकांसाठी निर्धारीत आहे. यामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांनी २३७ हेक्टर भात पऱ्हे टाकले असून २ हजार ५८७ हेक्टर क्षेत्रात रोवणी केली जात आहे. यावर्षीचा पाऊस भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा आहे.
बल्लारपूर तालुक्यातील वर्धा, इरई नदीला लागून व अन्य वाहणाऱ्या नाल्याला लागून असल्याने नदी व नाल्याच्या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. मध्यंतरी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोर जावे लागले. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावून अवघ्या दोन महिन्यात सरासरी ओलांडली आहे. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्याचा पाऊस शिल्लक आहे. परिणामी बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करावे लागण्याची भिती सतावत आहे.
तालुक्यातील कृषी उत्पादन कोरडवाहू असल्याने निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. यंदाचा पाऊस भात उत्पादक शेतकऱ्यांना तारक तर सोयाबिन, कापूस व तूर उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)