चुकीच्या नियोजनामुळे धान पिकात पाणी
By Admin | Updated: November 19, 2015 01:34 IST2015-11-19T01:34:20+5:302015-11-19T01:34:20+5:30
शासनाच्या पाटबंधारे उपविभाग वरोरा शाखा चारगाव बुज अंतर्गत येत असलेल्या पारोधी चंदनखेडा क्षेत्रात धानाचे पीक कापणीवर आले आहे.

चुकीच्या नियोजनामुळे धान पिकात पाणी
शेतकरी अडचणीत : चारगाव धरणाच्या कर्मचाऱ्याचा प्रताप
चंदनखेडा : शासनाच्या पाटबंधारे उपविभाग वरोरा शाखा चारगाव बुज अंतर्गत येत असलेल्या पारोधी चंदनखेडा क्षेत्रात धानाचे पीक कापणीवर आले आहे. विभागाला वारंवार सूचना करुनही पाटबंधारे विभागाच्या कोंगरे या कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षीतपणामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याने हे पाणी शेतात शिरले आहे. परिणामी अनेकांचे धानपीक पाण्याखाली आले आहे.
चारगाव बुज धरणातून नहराद्वारा पारोधी चंदनखेडा टेलकडे शेतीसाठी पाणी पुरविले जाते. या भागात धान पीक घेतले जात असून सध्यास्थितीत धान कापणीवर आले आहे. कापणीच्या वेळेस दरवर्षी चुकीच्या नियोजनामुळे धानपीक पाण्याखाली येवून धानाची नासाडी होत आहे. यामुळे अनेक शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे. या प्रकाराबाबत पाटबंधारे विभागाच्या जबाबदारी सांभाळत असलेल्या कोंगरे यांना जाणीव करुन दिली असता, ९ नोव्हेंबरला पाणी बंद केले जाईल, असे उत्तर दिले. मात्र त्यानंतरही पाणी सुरू ठेवून १५ नोव्हेंबरला बंद होईल, असे उत्तर दिले. परंतु ही तारीख जाऊनही पाण्याचा अपव्यय सुरू आहे. कोंगरे यांचे एका ठराविक व्यक्तीशी लागेबांधे असल्याचे कोरडवाहू जमिनीवर धानपीक घेण्यासाठी त्यांना पाणी उपलब्ध करून देत असल्याचे समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी केली.
सोबतच धानपिकात टाकलेली लाखोरी सुद्धा या पाण्यामुळे सडलेली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सद्यास्थितीत शेतात पाणीच पाणी आहे. त्यामुळे हे पीक कापणीवर येवूनही पाणी असल्याने कापणी करण्यास शेतकरी असमर्थ आहे. त्या स्थितीत कापणी केली तर धान हे पाण्याने ओेले होवून त्याचा परिणाम मालाच्या प्रतवारीवर दिसून येऊन मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन पाणी बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)