उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:23+5:302021-04-22T04:29:23+5:30

विजय वडेट्टीवार : मूल उपजिल्हा रुग्णालयाची केली पाहणी मूल : दिवसेंदिवस मूल तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात ...

Oxygen production project will be set up in the sub-district hospital | उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

विजय वडेट्टीवार : मूल उपजिल्हा रुग्णालयाची केली पाहणी

मूल : दिवसेंदिवस मूल तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक पातळीवरच बाधितांवर तात्काळ उपचार व योग्य सुविधा देता यावी म्हणून येत्या काळात उपजिल्हा रुग्णालय येथे १ कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प निर्माण करून ऑक्सिजन पाईप लाईनने जोडलेल्या ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मूल तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यात १३ जण मृत्युमुखी पडले आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील जनतेला स्थानिक पातळीवरच आरोग्य सुविधा मिळावी म्हणून मूल येथे ऑक्सिजन बेडयुक्त सर्व सोयीचे कोरोना केअर सेंटर निर्माण करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. सदर मागणीच्या अनुषंगाने वास्तविक परिस्थिती पाहून उपाययोजना करण्यासाठी म्हणून बुधवारी ना. वडेट्टीवार यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयाची पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उज्वल इंदोरकर, तालुका वैद्यकीय आधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, संवर्ग विकास अधिकारी मयूर कळसे यांच्याकडून तालुक्यातील आरोग्य व्यवस्था व इतर उपलब्ध सोयीबाबत आढावा घेतला. ना. वडेट्टीवार यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणारी आँक्सिजन पाईप लाईनयुक्त ५० खाटांची व्यवस्था कोरोना संसर्गाच्या काळातच नव्हे तर इतर वेळेसही त्याचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याचे सांगितले. कोरोना संसर्गाच्या काळात या ठिकाणी २२५ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून येत्या काळात आवश्यकता भासल्यास पुन्हा १०० खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले असल्याचे सांगताना ना. वडेट्टीवार यांनी सध्या याठिकाणी असलेल्या २० ऑक्सिजन व्हेंटिलेटर खाटांच्या व्यवस्थेत पुन्हा २० खाटांची वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बॉक्स

आरोग्य पदे भरणार

सध्या आरोग्य विभागात आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सेवारत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व अन्य आरोग्य कर्मचारी येत्या काळात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियुक्त करणार असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी सांगितले, सध्या उपलब्ध असलेली एक रुग्णवाहिका तालुक्यातील जनतेला कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णाच्या सेवेकरिता खनिज विकास निधीमधून एक रुग्णवाहिका देणार असून सहा महिन्यांनंतर दुसरी रुग्णवाहिका देण्यासंबंधी सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Oxygen production project will be set up in the sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.