वरोरा प्रशासनाला सुपूर्द केला ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:18+5:302021-05-05T04:46:18+5:30
फोटो : तहसीलदारांकडे ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर सुपूर्द करताना. रमेश राजूरकर चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने ...

वरोरा प्रशासनाला सुपूर्द केला ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर
फोटो : तहसीलदारांकडे ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर सुपूर्द करताना.
रमेश राजूरकर
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड तसेच इतर सुविधा मिळण्यास कठीण जात आहे. अशा वेळी ऑक्सिजनचा पुरवठाही कमी होत असल्यामुळे रुग्णांची धावपळ अधिकच वाढत आहे. त्यातच ग्रामीण भागातील रुग्णांचेही हाल होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता येथील जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था रुग्णांच्या मदतीला धावून आली असून, प्रशासनासह रुग्णांनाही मदत करीत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संस्थेने प्रशासनाकडे ऑक्सिजनसाठी धनादेश तसेच आता ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर सुपूर्द केले आहे. यामुळे रुग्णांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळणार आहे.
वरोरा तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे. अशा स्थितीत प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना काही प्रमाणात कमी पडत आहेत. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांनी यासाठी पुढाकार घेत मदत सुरू केली आहे. येथील जय गुरुदेव स्वच्छ जलसंस्थेचे अध्यक्ष रमेश राजूरकर तसेच पदाधिकाऱ्यांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसाठी त्यांनी नायब तहसीलदारांकडे काही दिवसांपूर्वी धनादेश सुपूर्द केला. यानंतरही रुग्णांची संख्या तसेच परिस्थिती बघता त्यांनी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, नायब तहसीलदार काळे यांच्या उपस्थितीमध्ये ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिला आहे. यावेळी संस्थेचे पुरुषोत्तम ननावरे, प्रफुल्ल हुसुकले, आदींची उपस्थिती होती. संकटाच्या या दिवसांमध्ये प्रत्येक नागरिकांसह प्रशासनाला संस्थेच्या वतीने वेळोवेळी मदत करण्याचा मानस संस्थाध्यक्ष रमेश राजूरकर यांनी व्यक्त केला आहे.