स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर कोरोना रुग्णांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:00+5:302021-05-05T05:00:46+5:30
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही रुग्ण एचआरसीटी चाचणी करण्यासाठी पॅथॉलॉजीत गर्दी करीत आहेत. ही चाचणी केल्यास रुग्णाच्या छातीत किती प्रमाणात संसर्ग झाला, याची माहिती मिळते. मात्र, सौम्य लक्षणे असली तरी सीटी स्कॅन करणे घातक आहे. या चाचणीमुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो, असा इशारा डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासारखे प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.

स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर कोरोना रुग्णांना घातक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टर सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाही स्टेरॉईड, सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर कर्करोगाला आमंत्रण देणारा असल्याचे कोरोना राज्य टास्क पोर्स समितीने नुकताच दिला. त्यामुळे सौम्य व लक्षणे नसणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांनी शक्यतो, अशा चाचण्या टाळण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही रुग्ण एचआरसीटी चाचणी करण्यासाठी पॅथॉलॉजीत गर्दी करीत आहेत. ही चाचणी केल्यास रुग्णाच्या छातीत किती प्रमाणात संसर्ग झाला, याची माहिती मिळते. मात्र, सौम्य लक्षणे असली तरी सीटी स्कॅन करणे घातक आहे. या चाचणीमुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो, असा इशारा डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासारखे प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.
सौम्य लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास चंद्रपूर शहरातील काही रुग्ण खासगी डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना काही डॉक्टर एचआरसीटी चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे पॅथाॅलॉजीमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते.
आजारांचा धोका
युवा अवस्थेत उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना उतारवयात कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सीटी स्कॅन करणे धोकादायक आहे. कोविडची सामान्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही रुग्णांचा आजार गृहविलगीकरणात राहून उपचार घेतल्यावरही बरा होऊ शकतो, अशी माहिती जि. प. आरोग्य विभागाने दिली.दम लागत असेल, ऑक्सिजन पातळी खाली जात असेल तर अशाप्रकारची चाचणी उपयुक्त ठरू शकते.
एक सीटी स्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे
एक सीटी स्कॅन काढणे म्हणजे रुग्णाच्या छातीचे ८० ते १४० एक्स-रे काढण्यासारखे आहे. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेता आपल्याच मर्जीने सीटी स्कॅन काढणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. रेडिएशनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवा अवस्थेत उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आल्यास उतारवयात धोका वाढतो.
११०० सीटी स्कॅन होतात दररोज
जिल्ह्यात दररोज ११०० सीटी स्कॅन होत असल्याचा अंदाज आहे. चंद्रपूर शहरात चार हॉस्पिटलला सीटी स्कॅनसाठी मान्यता आली. रुग्ण वाढल्याने काही हॉस्पिटलमध्ये सकाळी ७ वाजेपासूनच गर्दी होते. १६ स्लाईडखालील सीटी स्कॅनसाठी २००० रुपये, १६ ते ६४ स्लाईड सीटी स्कॅनला २५०० तर ६५ पेक्षा अधिक स्लाईड सीटी स्कॅनसाठी ३००० रुपये शुल्क आकारले जात आहे.