१०० एकरातील अतिक्रमण हटविले

By Admin | Updated: June 25, 2016 00:37 IST2016-06-25T00:37:49+5:302016-06-25T00:37:49+5:30

अवैध जंगलतोड करुन शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ शेतकऱ्यांचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला.

Over 100 encroach deleted | १०० एकरातील अतिक्रमण हटविले

१०० एकरातील अतिक्रमण हटविले

तगडा पोलीस बंदोबस्त : वनविभाग, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित
तळोधी (बा.) : अवैध जंगलतोड करुन शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३१ शेतकऱ्यांचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला. तब्बल १०० एकरात हे अतिक्रमण करण्यात आले होते. शुक्रवारी पोलिसांच्या तगडा बंदोबस्त संपूर्ण अतिक्रमण भुईसपाट करण्यात आले.
तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या राजोली (बोंड) या गावाजवळील कंपार्टमेन्ट ७२५ व १०५ या संरक्षित जंगलातील झाडे तोडून शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या अभिलाषा सोनटक्के यांनी या परिसरात होत असलेल्या अवैध जंगलतोड मोहिमेला आळा घालून अवैध अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील संरक्षित जंगलात ३१ शेतकऱ्यांनी जवळपास १०० एकरात हे अतिक्रमण केले होते.
ही बाब सोनटक्के यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांकडे अतिक्रमण हटविण्यासाठी परवानगी मागितली. वरिष्ठानी परवानगी देताच त्यांनी महसूल विभाग, पोलीस विभाग याची मदत घेतली व सर्व ताफा शुक्रवारी सकाळीच बोंड येथे दाखल झाला. त्यानंतर ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, त्या ठिकाणी ताफा पोहोचला व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले.
या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत गावकऱ्यांत तीव्र असंतोष दिसून आला. मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्तासमोर अतिक्रमण हटविणे रोखण्यासाठी कोणीही समोर आला नाही. ही कारवाई सकाळपासून सुरू होऊन दिवसभर चालली.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्यावेळी उपविभागीय अधिकारी उमेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, तहसीलदार समीर माने, नागभीडचे ठाणेदार बी.डी. मडावी व तळोधीचे ठाणेदार विवेक सोनवाने घटनास्थळी तळ ठोकून होते. (वार्ताहर)

पेट्रोलिंग करीत असताना अतिक्रमण होत असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली. सर्व माहिती गोळा केली व वरिष्ठांची परवानगी घेवून अनाधिकृत असलेले अतिक्रमण हटविले. यात ३१ जणांवर वनविभागाच्या कायद्यान्वये अवैध वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अभिलाषा सोनटक्के, वनपरिक्षेत्राधिकारी, तळोधी (बा.)

अतिक्रमणधारकांत
कारवाईची धास्ती
जवळपास १०० एकरात हे अतिक्रमण होते. अनुचित घटना घडू नये म्हणून दंगा नियंत्रण पथक, पोलीस पथक, वनविभागाच्या पथकाचा प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता. या कारवाईने अवैध अतिक्रमणधारकांत चांगलीच धास्ती पसरली आहे.

Web Title: Over 100 encroach deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.