विद्यार्थी शाळेत, गुरुजी बाहेर
By Admin | Updated: September 27, 2014 23:12 IST2014-09-27T23:12:20+5:302014-09-27T23:12:20+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांचा गुणवत्तात्मक दर्जा वाढविण्यासाठी प्र्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. याचा काही शाळांमध्ये चांगला परिणामसुद्धा बघायला मिळत आहे.

विद्यार्थी शाळेत, गुरुजी बाहेर
मारडा येथील शाळेतील प्रकार : प्रार्थनेच्यावेळी अनुपस्थित शिक्षकांवर होणार कारवाई
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
जिल्हा परिषदेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांचा गुणवत्तात्मक दर्जा वाढविण्यासाठी प्र्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. याचा काही शाळांमध्ये चांगला परिणामसुद्धा बघायला मिळत आहे. मात्र अद्यापही काही शिक्षक बदलायला तयार नाहीत. त्यामुळे आता मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी प्रथम शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम आरंभली आहे. यासाठी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांना भेटी देण्याचे सुचविले आहे. त्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक रविकांत देशपांडे यांनी शनिवारी सकाळी मारडा मोठा येथे शाळेला भेट दिली. यात एक शिक्षक सोडून उर्र्वरित सर्व शिक्षक शाळा सुरु होऊनही आले नसल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे आता या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
खासगी इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे शासनाने कठोर पाऊल उचलले आहे. ज्यांच्यावर भावी पिढी घडविण्याची जबाबदारी आहे, तेच आपल्या कर्र्तव्यापासून दूर जात असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्यतव्य काय, असा प्र्रश्न सध्या उपस्थित होत आहे. आता मात्र मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यानुसार प्रथम विद्यार्थ्यांचा एक सराव पेपर घेण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाणार असून जे विद्यार्थी यात मागे पडतील, त्यांना अतिरिक्त वर्ग घेऊन हुशार विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रथम शिक्षकांना शिस्त लावणे गरजेचे असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाळांना भेटी देण्याचा नियोजनबद्ध उपक्रम राबविणे सुरु केले आहे. यानुसार शनिवारी सकाळी मारडा मोठा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने तर, वेंडली येथील शाळेला उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी ७ वाजता भेट दिली. भेटीप्रसंगी प्रार्थनेच्यावेळी मारडा मोठा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये केवळ एक शिक्षक उपस्थित असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना आढळून आले. तर मुख्याध्यापिका उषा नंदूरकर, सहायक शिक्षक हिसोद तुरे, सुमन भगत, संध्या श्रीरामवार, वैशाली हेडाऊ, सुनीता चहारे, मंगला गौरकार आदी शिक्षिका अनुपस्थित होत्या. विशेष म्हणजे, काही शिक्षक परिपाठ सुरु असताना तर, काही शिक्षक प्रार्थनेच्या वेळी अनुपस्थित होते. या शिक्षकांनी बालकांच्या मोफत व सक्तीचा अधिनियम २००९ मधील कलम २४ चा भंग केला आहे. यामुळे कायद्यानुसार या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक रविकांत देशपांडे यांनी दिली. यावेळी विस्तार अधिकारी धनराज आवारी उपस्थित होते. तर, वेंडली येथील शाळेमध्ये उपशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, विस्तार अधिकार बबन अनमुलवार यांच्या पथकाने भेट दिली. यावेळी शिक्षिका सुमन मेहरे ७.२० वाजता उपस्थित झाल्या. तर, प्रेमदास बोरकर, रवींद्र अडबाले परिपाठाच्या वेळी उपस्थित नसल्याचे समजते. त्यामुळे यांच्यावरही वेळेवर उपस्थित न राहण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जो वर्ग निर्र्लेखित करण्यात आला आहे त्या ठिकाणी विद्यार्र्थ्यांना बसविण्यात आले असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. उपस्थित शिक्षकांनी दैनिक टाचन काढले नाही. मुलामुलींकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. मात्र मुलांचे स्वच्छतागृह बंद करून ठेवण्यात आल्याचे समजते.
मारडा येथील शाळेत शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानाची चाचणीही घेतली. यात काही विद्यार्थ्यांनी समाधानकारक उत्तर दिले असले तरी अनेक विद्यार्थ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे समजते. शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.