मूलमध्ये रेल्वेतून होतेयं दारूची तस्करी
By Admin | Updated: May 10, 2015 01:08 IST2015-05-10T01:08:05+5:302015-05-10T01:08:05+5:30
जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी झाली असली तरी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर वचक बसलेला नाही.

मूलमध्ये रेल्वेतून होतेयं दारूची तस्करी
मूल : जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी झाली असली तरी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर वचक बसलेला नाही. अवैध मार्गाने रेल्वेने दारू आणण्याची नवीन शक्कल लढविली जात असल्याने मूल शहरात दारूचा पुरवठा होऊ लागला आहे. रेल्वेची तिकीट कमी असल्याने दारूची तस्करी केल्यानंतरही फायदा मिळत असल्याने अवैध विक्री करणाऱ्यांनी बल्लारपूर-गोंदिया रेल्वेनी दारू आणण्याचा सपाटा सुरू केला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दारूबंदी झाल्याने मूल शहराबरोबरच तालुक्यातील गावा-गावात होणारे तंटे, उद्भवणारे वाद संपुष्टात येऊ लागले आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी नेहमी होणाऱ्या भांडणावर पायबंध घातला गेला आहे. दारूबंदीमुळे उध्दवस्त होणारे संसार सावरण्याचा प्रयत्न असताना मात्र अवैध मार्गाने पैसे कमाविण्याची सवय जडलेल्या लोकांना चैन पडत नसल्याचे दिसते. अवैध मार्गाने दारू आणून दारुड्यांची गरज भागविली जात आहे. मूळ किमतीपेक्षा तिप्पट किमतीने दारूची विक्री होत असल्याने उर्वरित खर्च वजा जाता अशा दारू विक्रेत्याला अधिक फायदा मिळत असल्याने अवैध विक्री करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. मूल शहरातील कुठल्याही ठिकाणी दारू मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र जास्त किंमत मोजावी लागत असल्याचे शौकीन सांगतात. यावरुन दारूबंदीमुळे उद्धवस्त होणारे संसार सावरण्याऐवजी मोडकळीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मूल पोलिसांनी ग्रामीण भागात महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेचा आधार घेऊन अवैध दारूची विक्री करणाऱ्यावर पायबंद घालावा. तसेच मूल शहरात आपली यंत्रणा सज्ज करून अवैध दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मूलला गोंदियावरुन येणाऱ्या सर्व रेल्वेची चौकशी करावी. (तालुका प्रतिनिधी)