भद्रावती येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे आयोजन
By Admin | Updated: December 31, 2015 01:10 IST2015-12-31T01:10:50+5:302015-12-31T01:10:50+5:30
भद्रावती येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम ३१ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत लोकमान्य शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

भद्रावती येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे आयोजन
विविध कार्यक्रम : रोगनिदान व उपचार शिबिर
आयुधनिर्माणी (भद्रावती) : भद्रावती येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ४७ वा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम ३१ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत लोकमान्य शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवादरम्यान सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, महिला मेळावा, परिसंवाद स्पर्धा, भजन स्पर्धा, राष्ट्रसंत व्याख्यानमाला, भारुड, कीर्तन, प्रवचन व गोपालकाला इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
३१ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता सप्तखंजरी वादक संदीप पाल व संच यांचे राष्ट्रीय कीर्तन, १ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता राष्ट्रसंत व्याख्यानमालेत दारू व व्यसनमुक्ती या विषयावर पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, गुरुकुंज आश्रमचे रवींद्र कुमार, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नवदुर्गा नाटीकेचे सादरीकरण होणार आहे.
२ जानेवारीला सकाळी ८.३० वा. विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद स्पर्धा, सकाळी ११ वाजता रोगनिदान व उपचार शिबिर, मुळव्याध, अंडवृद्धी, वात व जनरल ओपीडी डॉ. जगदीश पाटील व संच, आयुर्वेदिक रुग्णालय गुरुकुंज आश्रम यांच्या सहकार्याने होणार आहे. दुपारी १.३० वाजतापासून बालकीर्तनकार साक्षी अतकरे व योगेश प्रधान, पांढरकवडा यांचे राष्ट्रीय कीर्तन, सायंकाळी ६.३० वाजता दिलीप महाराज गव्हाडे व संच अमरावती यांचे भारुड, रात्री ८ वाजता संस्कारक्षम व युवा घडविणारा संगीत एक पात्री नाट्यप्रयोग ‘मी राष्ट्रमाता जिजाऊ बोलतेय’ होणार असून चैताली विजयराव खडी व संच हे नाटाचे सादरीकरण करणार आहेत.
३ जानेवारीला कीर्तन, गोपालकाला व चंद्रपूर जिल्हा दारू व व्यसनमुक्ती प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ व २ जानेवारीला बाल, महिला व प्रौढ विभागाची भजन स्पर्धा होत असून त्याकरिता ३६ हजार २६८ रुपयांचे बक्षीस आहे. (वार्ताहर)