आनंदवनात ३ नोव्हेंबरपासून बालशिक्षण परिषदेचे आयोजन

By Admin | Updated: November 1, 2016 00:55 IST2016-11-01T00:55:41+5:302016-11-01T00:55:41+5:30

विदर्भात पहिल्यांदाच होत असलेल्या महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणेच्या २३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्य ....

Organizing the Balshikshan Parishad from November 3 in Anandavane | आनंदवनात ३ नोव्हेंबरपासून बालशिक्षण परिषदेचे आयोजन

आनंदवनात ३ नोव्हेंबरपासून बालशिक्षण परिषदेचे आयोजन

भरगच्च शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन : जिल्ह्यात पहिलीच संशोधनपर परिषद
वरोरा : विदर्भात पहिल्यांदाच होत असलेल्या महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणेच्या २३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्य तीन दिवसीय बाल शिक्षण परिषदेचे आयोजन स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे ३ ते ५ नोव्हेंबरला होत आहे.
सदर परिषदेचे उद्घाटन विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. बालशिक्षण शास्त्र आणि व्यवहार हा या परिषदेचा मुख्य विषय ठरविण्यात आला आहे.
बालशिक्षणाबाबत मंथन होणाऱ्या या राज्यस्तरीय परिषदेमध्ये बालक कसे शिकतात, कसे शिकावे, त्याला सहायभूत व परिणामकारक बाबी, शिक्षक, पालक व समाजाची भूमिका या विषयावर बालशिक्षणात प्रयोग करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांचे संशोधनपर निबंधांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये ‘दिवास्वप्न’ मोनिका सारंगधर, नाशिक, ‘भाषा व गणित अध्यापन’ संगीता पाटील दुधे, ‘बालवर्गातील भाषाशिक्षण’ शितल भालेराव, धुळे, ‘खेळघर आणि प्राथमिक शाळा यातील रचनावादी शिक्षण’ प्राची बोकील, पुणे, ‘वर्गशिक्षण पूर्वतयारी आणि कार्यवाही बाबत पालकसंपर्क’ प्रज्ञा कुळकर्णी, दुबई, ‘मानसिक स्वास्थ आणि खेळ’ अश्विन किनारकर, नागपूर, ‘बालशिक्षण व मुल्यमापन’ सुरेखा पेंडसे, पुणे, ‘संधी आणि प्रोत्साहन’ शेख जमील शेख इस्माईल भामरागड, ‘मुल्यवर्धन कार्यक्रम’ दिलीप केणे, नागपूर, ‘बहुभाषीय शिक्षण समिक्षा’ आमटे भामरागड, ‘न शिकवता शब्द व अक्षर वाचन’ प्रिती उपाध्येय वाई, ‘अभ्यासनाट्यातून विषय शिक्षण’ प्रकाश पारखी, पुणे, ‘कलाशिक्षण जागृती’ नवीन चोपडा या संशोधनपर निबंधांचा समावेश आहे. सदर सत्रांच्या अध्यक्षपदी विशाखा देशपांडे, ठाणे, सुरेखा पेंडसे पुणे, कल्पना डेव्हीड, चंद्रपूर, डॉ. बाळकृष्ण बोकील, पुणे, प्रशांत आर्वे, चंद्रपूर हे असणार आहे.
परिषदेमध्ये राज्यातील आघाडीचे बालशिक्षणतज्ञ प्रा. रमेश पानसे, अलका बियानी, अश्विनी गोडसे, सुषमा पाध्ये, बाळकृष्ण बोकील, डॉ. दिनेश नेहते पुणे, वर्षा उदयन कराड, रती भोसेकर, ठाणे यांचे मार्गदर्शन व शास्त्रीय दृष्टिकोन, नवोपक्रमाचा लाभ यावेळी उपस्थितांना मिळणार आहे. त्याद्वारे या क्षेत्रातील नवनवे बदल व भविष्यातील आव्हाने आपल्या दृष्टिपथात येणार आहे.
विदर्भातील पहिल्याच व आगळ्यावेगळ्या बालशिक्षण परिषदेचा लाभ सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी बालवाडी शिक्षिका, पालक व बालशिक्षणाबाबत शास्त्रीय माहिती जाणण्यास उत्सुक सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक महाराष्ट्र बालशिक्षण परिषद चंद्रपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष हरीश ससनकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Organizing the Balshikshan Parishad from November 3 in Anandavane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.