आयुध निर्माणी हॉस्पिटलला कोविड केंद्र म्हणून मिळणार मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST2021-05-08T04:29:05+5:302021-05-08T04:29:05+5:30
फोटो भद्रावती : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भद्रावती तालुका तर हॉटस्पॉट ठरला ...

आयुध निर्माणी हॉस्पिटलला कोविड केंद्र म्हणून मिळणार मंजुरी
फोटो
भद्रावती : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भद्रावती तालुका तर हॉटस्पॉट ठरला आहे. येथील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यात येणार आहे. या दृष्टीने आरोग्य यंत्रणेचा आढावा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला.
याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे, वैद्यकीय अधिकारी मनीष सिंग, संवर्ग विकास अधिकारी डॉ.मंगेश आरेवार, ठाणेदार सुनील सिंह पवार, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, डॉक्टर आसुटकर, डॉक्टर नितीन सातभाई उपस्थित होते.
भद्रावती येथील शिंदे मंगल कार्यालय कोविड सेंटर तसेच जैन मंदिर येथील कोविड सेंटरला पालकमंत्र्यांनी भेट दिली. अत्यावश्यक आरोग्य सुविधा याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. कोविड रुग्णांबाबत विचारपूस केली.
अत्यावश्यक आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातील. शिंदे मंगल कार्यालय कोविड केंद्राला देऊन रवींद्र शिंदे यांनी सामाजिक दायित्व पार पाडले आहे. इतरांनीसुद्धा सामाजिक कार्यासाठी समोर यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आयुध निर्माणी चांदा हॉस्पिटलला कोविड सेंटर म्हणून मंजुरी देण्यासाठी आजच जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे सोबत बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
सर्वसुविधांयुक्त अशा आयुध निर्माणी चांदाच्या हॉस्पिटलला कोविड सेंटर म्हणून मान्यता मिळावी तसेच यासोबतच १५ टक्के कर्मचाऱ्यांवर काम करण्याची आयुध निर्माणी चांदाला परवानगी देण्यात यावी, ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचे ऑनलाइन लसीकरण बंद करून ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्यात यावे, याबाबत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना निवेदन दिले.