‘त्या’ नरभक्षक वाघाला ठार मारण्याचे आदेश
By Admin | Updated: February 1, 2017 00:29 IST2017-02-01T00:29:15+5:302017-02-01T00:29:15+5:30
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येत असलेल्या ..

‘त्या’ नरभक्षक वाघाला ठार मारण्याचे आदेश
वनविभाग लागला कामाला : शिवणी व सिंदेवाही परिसर दहशतीत
मोहाळी (नलेश्वर) : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येत असलेल्या शेतशिवारात व गावात सातत्याने एक महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याच्या दृष्टीकोनातून वनविभागाचे प्रधान सचिव भगवान यांनी त्या वाघाला ट्रॅक्युलायझिंग इंजेक्शन शुट करुन बेशुद्ध करणे व कैद करणे ते शक्य होत नसेल तर शुट करून ठार मारण्याचे आदेश दिलेले आहेत.
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असलेल्या शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एका नरभक्षक वाघाने महिन्याभरापासून सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावखेड्यात व शेतशिवारात धुमाकूळ घालून चकबाम्हणी, शिवणी व मोहाळी येथील तीन महिलांना जागीच ठार मारले तर वाकल व वानेरी येथील दोन महिलांना गंभीररित्या जखमी केले. या घटनेने संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
तो नरभक्षक वाघ शेतशिवारातच नव्हे तर गावातही प्रवेश करु लागल्याने रात्रीच्या सुमारास गावागावातील नागरिक भीतीपोटी घराच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मागील सहा- सात दिवसांपासून १५० च्या जवळपास वनकर्मचारी व अधिकरी २० ते २५ गाड्यांच्या ताफ्यासह रात्रंदिवस गस्त घालत आहेत. या कामी पोलीस विभागाचीही मदत घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर त्या वाघाला कैद करण्यासाठी सिंदेवाही व शिवणी वनपरिक्षेत्रातील काही गावात पिंजरे व पिंजऱ्यात बकऱ्या, कुत्रे व रेडाही ठेवण्यात आला. ठिकठिकाणी ट्रप कॅमेरे लावून शॉर्प शुटर तैनात ठेवले आहे. एवढे करूनही वाघ सापडलेला नाही.
त्यामुळे त्या नरभक्षक वाघाचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याच्या दृष्टीकोनातून ३० जानेवारीला दुपारी १ वाजता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक गरड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या समितीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीला उपसंचालक गजेंद्र नरवणे व सर्व विभागाचे वनसंरक्षक, ताडोबाचे वाघ तज्ज्ञ, एन.जी.ओ., ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी, मोहाळी येथील सरपंच सुनिता दोडके उपस्थित होते.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य व गावातील नागरिकाचा उद्रेक पाहता शक्यतोवर वाघाला बेशुद्ध करणे व कैद करणे तसेच न झाल्यास शुट करुन ठार मारण्याचे आदेश प्रधान सचिव भगवान यांच्याकडून मागविण्यात आले. भगवान यांनी त्या वाघाला बेशुद्ध करुन कैद करणे शक्य न झाल्यास शुट करुन ठार मारण्याचे आदेश दिल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)