पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना रुजू होण्याचे आदेश
By Admin | Updated: December 8, 2014 22:33 IST2014-12-08T22:33:14+5:302014-12-08T22:33:14+5:30
मागील सहा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन अखेर सुटले आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी महिलांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्या,

पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना रुजू होण्याचे आदेश
चंद्रपूर: मागील सहा दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन अखेर सुटले आहे. शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी महिलांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्या, अन्यथा कडक कार्यवाहीला सामोरे जा, असे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील काही अधिकाऱ्यांच्या प्रवृत्तीमुळे शालेय पोषण आहार योजनेला ग्रहण लागले. शाळांमधून विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण मिळू लागले. अल्प मानधनावर स्वयंपाकी म्हणून गरजु महिलांना कामावर ठेवण्यात आले. मात्र, काही ठिकाणी आपल्याच मर्जीतील महिलांना कामावर ठेवण्यासाठी खटाटोप झाले. पुढे हा प्रकार वाढतच गेला. दरम्यानच्या काळात, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पोषण आहार योजना चालवण्याचे शासनाने धोरण आणले.
याचा फायदा घेत काहींनी पूर्वीपासून कामावर असलेल्या महिलांना डावलून आपल्या मर्जीतील महिलांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे अन्यायग्रस्त महिलांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारुन जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु केले. उपोषणाच्या सहाव्या दिवशी चार महिलांची प्रकृती खालावल्यामुळे आयटकचे जिल्हा अध्यक्ष प्रा. कन्नाके, उपाध्यक्ष संतोष दास, विनोद झोडगे, अजय रेड्डी यांनी शिक्षणाधिकारी देशपांडे यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून २९ शाळांतील ४६ महिलांना मानधनासह कामावर रूजू करून घ्यावे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)