मोखाळा येथील नवीन दारू दुकानाला महिलांचा विरोध
By Admin | Updated: August 9, 2014 01:38 IST2014-08-09T01:38:32+5:302014-08-09T01:38:32+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सावली तालुक्यातील मोखाळा हद्दीत परवानाधारक नविन दारू दुकान उघडण्यास महिलांनी विरोध केला असून ...

मोखाळा येथील नवीन दारू दुकानाला महिलांचा विरोध
उपरी : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सावली तालुक्यातील मोखाळा हद्दीत परवानाधारक नविन दारू दुकान उघडण्यास महिलांनी विरोध केला असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेले बिअर बारसुध्दा बंद करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मोखाळा येथील महिलांनी दिले आहे.
सदर निवेदनातील माहितीनुसार मोखाळा हे गाव चंद्रपूर - गडचिरोली महामार्गावर असून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यालगत आहे. अशी स्थिती असतानासुद्धा शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे या परिसरात दारूची दुकाने व बिअरबार उघडली आहेत. या पार्श्वभूमीवर मोखाळा हद्दीत बिअरबारची परवानगी दिली. मात्र १३ मे २०१३ ला याच हद्दीत परवानाधारक देशी दारू विक्रीचे दुकान लावण्यासाठी परवानाधारकांनी ग्रामपंचायतकडे अर्ज केला होता. त्यावेळी आयोजित ग्रामसभेत महिलांनी एकमताने कोणत्याही दारू दुकानास परवानगी देण्यात येवू नये असा ठराव पारीत केला आणि तो ठराव जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आला. त्यानंतर तो ठराव रद्द करण्यात आला नाही. मात्र २३ जून २०१४ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सदर ठराव चुकीच्या मार्गाचे मंजुर करण्यात आला आहे. ज्या विषयावर ही ग्रामसभा घेण्यात आली त्याचे नोटीस गावात सात दिवसापूर्वी लावायला पाहिजे होती. परंतु नोटीस एक दिवस आधी लावण्यात आल्या. गावातील महिला कामानिमित्याने शेतावर निघून गेल्या. ज्या महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या, त्यांना पुर्वकल्पना दिल्याने ग्रामसभेला उपस्थित राहिल्याचा आरोप केला आहे. एकंदरीत ही ग्रामसभाच चुकीची असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोखाळा येथील सामाजिक कार्यकर्त्या व महिलांनी या संदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
मोखाळा हद्दीत नविन होणारे देशी दारू दुकान हे व्याहाड (बुज.)च्या बस थांब्याजवळ असलेल्या अशोक बिअरबारजवळ होणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास या थांब्यावर असणाऱ्या शाळकरी मुली, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे येथे असलेले बिअरबारसुद्धा बंद करावे. जे बार याठिकाणी आहे, त्यांच्या जवळ दारूचे दुकान कशासाठी असा सवालही महिलांनी केला आहे.