शिक्षकांना फसवून संस्थाचालकांनी हडपले २२ लाख
By Admin | Updated: October 12, 2015 01:21 IST2015-10-12T01:21:43+5:302015-10-12T01:21:43+5:30
संस्थाचालकांकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याबाबतच्या घटना राज्यात समोर येत असताना जिल्ह्यातही अशीच एक घटना पुढे आली आहे.

शिक्षकांना फसवून संस्थाचालकांनी हडपले २२ लाख
बिनपगारी शिक्षकांच्या नावे उचलले कर्ज : बँक व्यवस्थापकाचाही हात असल्याचा आरोप
आशिष देरकर गडचांदूर
संस्थाचालकांकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याबाबतच्या घटना राज्यात समोर येत असताना जिल्ह्यातही अशीच एक घटना पुढे आली आहे. राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथील दादाराव सोळंके या संस्थापकाने शिक्षक व कर्मचाऱ्यांची खोटी पगार बिले बनवून शिक्षकांच्या नावाने २२ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
राजुरा तालुक्यातील आई तुळजा भवानी महिला शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली (खुर्द) तथा महर्षी उत्तम स्वामी महाराज कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली (खुर्द) तथा सावित्रीबाई फुले मुलामुलींच्या वसतिगृहाचे संस्थापक दादाराव सोळंके यांनी सन २०१० मध्ये आपल्या संस्थेतील कार्यरत २२ कर्मचाऱ््यांच्या नावे प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे २२ लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून उचलले व ती रक्कम शाळा बांधकामासाठी वापरली.
विशेष म्हणजे बिनपगारी शिक्षकांना पगार देत असल्याबाबत खोटे पुरावे तयार केले. त्याचा आधार घेत प्रत्येक शिक्षकाच्या नावावर वैयक्तिक कर्ज उचलले. सदर कर्ज घेताना संस्थापक दादाराव सोळंके यांनी पुसद अर्बन बँक शाखा चंद्रपूरचे तत्कालिन व्यवस्थापक माने यांनी कर्ज उचलण्याकरिता पगारपत्रक आवश्यक असल्याच्या सूचना केल्या. त्यावरून सोळंके यांनी बोगस पगार पत्रक बनवून घेतले आणि त्यावर मुख्याध्यापक, वसतीगृह अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन कर्ज मंजूर करवून घेतले.
कर्ज जरी शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांंच्या नावे उचलत असले तरी कजार्चे हप्ते संस्था अध्यक्ष दादाराव साळुंके व सचिव संगीता अहीरकर भरणार असल्याचे हमीपत्र बँकेला देण्यात आले होते. कर्जाचे काही हप्ते संस्थापक दादाराव सोळंके यांनी भरले. मात्र काही दिवसांनी बँकेचे हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेकडून आता २२ कर्मचाऱ्यांना मालमत्ता जप्त करण्याबाबत वारंवार नोटीसा मिळत आहेत. त्यामुळे सर्व कर्मचारी सध्या अडचणीत सापडले आहेत. सदरील कर्ज भरण्यासंबंधी सर्व कर्मचारी संस्थापक दादाराव सोळंके यांच्याकडे गेले असता, त्यांनी सध्या माझ्याकडे पैसे नसून पैसे आल्यावर भरतो म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिली.
संस्थापक दादाराव सोळंके यांनी अनिल राठोड, गोपाल ठाकरे, राजेश उलमाले, विवेक गारघाटे, हनुमान वनकर, गणेश थेरे, पुंडलिक काळे, महेंद्र चौधरी, अनिल रामटेके, रघुनाथ मेश्राम, रवींद्र गोरे, प्रभाकर अहिरकर, साधना डाहुले, शशिकांत पवार, ज्ञानेश्वर कुंभारे, भगवान सोळंके, बळवंत क्षिरसागर, धनंजय खाडे, तन्वीर बेग, विजय बारसागडे, शितल महले व प्रभाकर बोढे इत्यादींच्या नावावर कर्ज उचलले. सदर कर्ज घेताना सोळंके यांनी कर्ज आपण स्वत: भरणार असल्याबाबतचे हमीपत्र १०० रुपयाच्या मुद्रांकावर लिहून दिले होते. तरीदेखील बँकेचे मालमत्ता जप्तीबाबत पत्र येत आहे. बँकेने सर्वांना अंतिम मागणी नोटीस पाठविली आहे.