ओपनस्पेस बनले हागणदारीचे मुख्यालय

By Admin | Updated: February 7, 2015 23:22 IST2015-02-07T23:22:06+5:302015-02-07T23:22:06+5:30

संपूर्ण स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शासनाने हागणदारीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बाळगला असला तरी गडचांदुरात आजही अनेक मोकळे भुखंड

OpenSpace became headquartered at Headquartered | ओपनस्पेस बनले हागणदारीचे मुख्यालय

ओपनस्पेस बनले हागणदारीचे मुख्यालय

गडचांदूर: संपूर्ण स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शासनाने हागणदारीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बाळगला असला तरी गडचांदुरात आजही अनेक मोकळे भुखंड हागणदारीचे केंद्र बनले आहे. त्यामुळे प्रौढांना खुल्या वातावरणात फिरण्यासाठी किंवा छोट्या मुलांना खेळण्यासाठी एकही मोकळी जागा उरली नाही.
गडचांदूरात पाच ते सहा मोकळ भुखंड आहेत. याठिकाणी आजपर्यंत ग्रामपंचायत असताना कोणत्याही प्रकारचे सौंदर्यीकरण करण्यात आले नाही. नगर परिषद प्रशासनसुद्धा कोणताही पुढाकार घेत असल्याचे दिसत नाही. एरवी नागरिक प्लॉट विकत घेताना ओपनस्पेसलगतच्या प्लॉटची मागणी करतात. मात्र गडचांदुरात अगदी याउलट चित्र आहे. कोणीही अशा ओपनस्पेसजवळ राहणे पसंत करीत नाही. कारण गडचांदुरातील निम्म्या ओपनस्पेसवर हागणदारीच आहे. सुरुवातीलाच विकसीत ले-आऊट न टाकल्यामुळे ओपनस्पेसची अशी दुरावस्था झाली आहे. कोणत्याही प्रकारचे सौंदर्याकरण करण्यात आलेले नाही.
प्रभाग दोनमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव असलेल्या वॉर्डात दाटवस्तीच्या मध्यभागी मोठे ओपनस्पेस आहे. या ओपनस्पेसमुळे येथील नागरिकांना दुर्गंधी व शौचास बसणाऱ्यांचा फार त्रास आहे. त्यांना कुणी टोकल्यास त्याचे परिणाम फार वाईट येत असल्याचे अनुभव येथील नागरिक सांगतात. या ओपनस्पेसला पूर्णपणे हागणदारी बनविले आहे.
शासनाकडून शौचालय बांधण्याकरिता कर्ज मिळते. मात्र त्याचा लाभ घेण्याची इच्छा लोकांमध्ये दिसत नाही. नगरपालिकासुद्धा त्यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यात अपयशी ठरली आहे. इतर गोष्टींवर अवाढव्य खर्च करणारे लोक शौचालय बांधण्याकरिता मात्र हयगय करताना दिसतात. प्रभाग दोनमधील ओपनस्पेसनवर बाहेरील वॉर्डातील महिला येऊन उघड्यावर शौचास बसतात. एवढेच नाही तर इथे इतरत्र मृत जनावरेसुद्धा आणून टाकली जातात. त्यामुळे या परिसरात सतत दुर्गंधीचे वातावरण असते.
पावसाळ्यात तर विविध ओपनस्पेसवर विदारक परिस्थिती असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वॉर्डातील नागरिकांनी ओपनस्पेसचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून वारंवार निवेदने दिली. परंतु यावर नगरपरिषदेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यात हागणदारी मुक्त शहर अभियान राबविण्यात येत आहे. या चळवळीच्या यशस्वीतेसाठी अनेक नगर परिषदांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले असताना गडचांदूरमध्ये मात्र या चळवळीला खीळ बसत आहे. ईच्छाशक्ती असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची गडचांदुरात कमतरता आहे. स्थानिक पातळीवर असलेले राजकीय मतभेद, वैयक्तिक मतभेद व अन्य कारणांमुळे तालुक्यातील एकमेव नगरपरिषद व क्रमांक एकची लोकसंख्या असलेले गडचांदूर शहर हागणदारी मुक्त अभियानापासून कोसो दूर आहे. ओपनस्पेसचा योग्य उपयोग नगरपरिषदेने करायला पाहिजे. मात्र ग्रामपंचायतीने योग्य धोरण न आखल्यामुळे अनेक ओपनस्पेस गोदरीमय झाले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: OpenSpace became headquartered at Headquartered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.