ताडोबा पर्यटकांच्या सेवेत खुली बस दाखल
By Admin | Updated: March 4, 2015 01:29 IST2015-03-04T01:29:06+5:302015-03-04T01:29:06+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पतील वनभ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत खुली बस आली आहे.

ताडोबा पर्यटकांच्या सेवेत खुली बस दाखल
पुन्हा तीन बसेस येणार : टायगर फाऊंडेशन कंझर्व्हेशनचा पुढाकार
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पतील वनभ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सेवेत खुली बस आली आहे. डेक्कन ओडीसीमधून ताडोबा अभयारण्याच्या पर्यटनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या सेवेसोबतच ती वर्षभर अन्य पर्यटकांनाही सेवा देणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून ताडोबा अभयारण्यात खुली पर्यटन बस सुरू करण्याची मागणी विचाराधिन होती. यावेळी ती पूर्ण झाली आहे. टायगर कंझर्व्हेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून या बसेसच्या खरेदीसाठी निधी मिळाला आहे. २२ पर्यटक एकाच वेळी वन भ्रमंती करू शकतील, अशी व्यवस्था आहे. या बसेस खास तयार करून घेण्यात आल्याने सुरक्षेची पूर्णत: काळजी घेण्यात आली आहे. ती नव्याने बनवून घेण्यात आली असून आवश्यक त्या सुधारणही करून घेण्यात आल्या आहेत.
सर्वसामान्य जनतेला पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी साडेतीनशे ते चारशे रूपये प्रति व्यक्ती प्रति फेरी शुल्क आकारला जाणार आहे. यात वेगळे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही, यामुळे सर्वसामान्य पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी वनविभागाला आशा आहे. मोहर्ली गेटवरून दररोज ही फेरी सोडली जाणार आहे.
ताडोबा पर्यटनासाठी महिन्यातून एकदा डेक्कन ओडीसीतून येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या पर्यटनासाठी ती प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर अन्य दिवशी ती सर्व पर्यटकांच्या सेवेत असणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची गर्दी आणि मागणी लक्षात घेता येथील पर्यटन पुन्हा विकसित करण्यासाठी चार खुल्या बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी २ मार्चला एक बस आली आहे. या आठवड्यात परिवहन विभागाकडून सोपस्कर पार पडल्यावर ती चारपाच दिवसातच पर्यटकांच्या सेवेत रूजू होईल.
- जी.पी. गरड, क्षेत्रीय संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प