अरेरे, रूग्णालयाच्या शवगारात प्रेत सडताहेत !
By Admin | Updated: November 6, 2014 22:51 IST2014-11-06T22:51:35+5:302014-11-06T22:51:35+5:30
दुरवस्था आणि अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाअभावी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आता संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या रूग्णालयाच्या शवगारात असलेले प्रेत

अरेरे, रूग्णालयाच्या शवगारात प्रेत सडताहेत !
अशी कशी ही अवहेलना ! : बॉडी फ्रिजर १५ दिवसांपासून बंद
चंद्रपूर : दुरवस्था आणि अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाअभावी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आता संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या रूग्णालयाच्या शवगारात असलेले प्रेत ठेवण्याचे फ्रिजर गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. परिणामत: आलेले प्रेत दुसरीकडे ठेवण्याची व्यवस्था नसल्याने चक्क प्रेत सडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शवांची ही अवहेलना गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असली तरी, यावर जिल्हा सामान्य रूग्णालयाला अद्यापही उपाय मात्र सापडलेला नाही, हे आश्चर्यच आहे.
येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील शवविच्छेदनगृहात असलेल्या फ्रिजरमध्ये एकाच वेळी १० मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. यात, एका कप्प्यात तीन प्रेत मावतील असे दोन कप्प्यांचे एक आणि एकाच कप्प्प्यात एक प्रेत मावेल अशा चार कप्प्यांचा समावेश असलेले अन्य फ्रिजर आहे. मात्र त्यातील सहा प्रेत ठेवण्याचे फ्रिजर गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. तर दुसरेही नादुरुस्त आहे. ते ठोकल्याशिवाय सुरूच होत नाही. बरेचदा आपोआप बंद पडून जाते.
बेवारस आढळलेले अथवा ओळख न पटू शकणारे मृतदेहच या ठिकाणी ओळख पटेपर्यंत ठेवले जातात. किंबहुना शवविच्छेदनासाठी विलंब होत असल्यास काही तासांसाठी या ठिकाणी प्रेत ठेवण्यात येतात. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून फ्रिज बंद असल्याने शवांची अवहेलना सुरू आहे. गेल्या आठवड्यात चंद्रपुरातील एका युवकाचे प्रेत स्मशानभूमीत बेवारस आढळले होते. ते याच फ्रिजरमध्ये ठेवण्यात आले. तीन दिवसांनी नातेवाईकांनी येऊन प्रेताची ओळख पटविली. मात्र प्रेताची अवस्था पाहण्यापलिकडची होती. नातेवाईकांच्या मते प्रेत ताब्यात घेण्याच्या अवस्थेतही नव्हते. तरीही त्यांनी ताब्यात घेऊन धार्मिक सोपस्कार पार पाडले. असाच प्रकार याच आठवड्यात अन्य पे्रतांसदर्भातही घडला आहे. नातेवाईकांना प्रेत ताब्यात घेण्याशिवाय गत्यंतर नसते.
या ठिकाणचे फ्रिजर बंद पडण्याचे कारण मेंटनन्स नसणे असे सांगितले जात आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या दुरूस्ती व देखभालीसाठी जो निधी येतो, तोच यासह अन्य कामांवरही खर्च केला जातो. एकदा फ्रिज बंद पडला की स्थानिक स्तरावर तो दुरूस्त करण्याची सोय नाही. पुण्यावरून तंत्रज्ज्ञ येईल तेव्हाच तो दुरूस्त होतो. तोपर्यंत आहे त्याच स्थितीत काम चालवून घ्यावे लागते. नातेवाईक आधीच दु:खात असतात. बरेचदा नातेवाईकांची तक्रारीची मानसिकता नसते. त्यामुळे हा प्रकार आजवर उघड झालाच नाही. मात्र प्रेतांची विटंबना सुरु आहेच.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील पंधरा दिवसांपूर्वीच या ठिकाणचे फ्रिजर युनिट सुरु करण्यात आले होते. मात्र त्यातील एक युनिट फक्त एक दिवस चालला. दुसऱ्या दिवशी पुन्हा बंद पडला. तंत्रज्ज्ञ पुण्याला असल्याने तातडीने येण्याची व्यवस्था नाही. स्थानिक स्तरावर दुरूस्तीचे अधिकारही नाहीत. त्यामुळे आता पुण्यावरून मेकॅनिक येईपर्यंत वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नाही.
जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या समस्यांचा डोंगर आहे. तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनुने यांच्या काळात तर समस्यांनी कळसच गाठला होता. नवे अधिकारी डॉ. मुरंबीकर १ नोव्हेंबरपासून रुजू झाले आहेत. त्यांच्या काळात बदलाची अपेक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)