पिपरबोडी गावाचा जाण्याचा मार्गच आयुध निर्माणी बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:29+5:302021-03-15T04:26:29+5:30

भद्रावती : आयुध निर्माणी लगत असलेल्या पिपरबोडी गावाचा शहरात तसेच निर्माणी परिसरात जाण्यासाठी असणारे प्रवेशद्वारच आयुध निर्माणी प्रशासन ...

The only way to reach Piperbodi village is to close the ordnance factory | पिपरबोडी गावाचा जाण्याचा मार्गच आयुध निर्माणी बंद करणार

पिपरबोडी गावाचा जाण्याचा मार्गच आयुध निर्माणी बंद करणार

भद्रावती : आयुध निर्माणी लगत असलेल्या पिपरबोडी गावाचा शहरात तसेच निर्माणी परिसरात जाण्यासाठी असणारे प्रवेशद्वारच आयुध निर्माणी प्रशासन येत्या काही दिवसात बंद करणार असल्याच्या सूचना गावकऱ्यांना मिळाल्या आहे. तो मार्ग बंद करण्यात येऊ नये, याकरिता गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

जुनी व नवीन पिपरबोडी असे दोनशे घरांचे गाव आयुध निर्माणी स्थापनेच्या पूर्वीपासून वास्तव्यात आहे. निर्माणी स्थापन झाल्यानंतर प्रशासनाने आपला संपूर्ण परिसर काटेरी तारांचे कुंपण करून बंदिस्त केला होता व गावकऱ्यांसाठी दोन ठिकाणी प्रवेशद्वार बांधण्यात आले. त्यामुळे येथील शाळेतील विद्यार्थी, आयुध निर्माणी कर्मचारी तसेच नागरिक भद्रावती शहरात तसेच इतर परिसरात त्यांना जाता येता येत होते. आयुध निर्माणी प्रशासनाने ताराचे काटेरी कुंपण हटवून आता या भागात मोठी सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. त्यामुळे येथील प्रवेशद्वारासह गावातील रस्ता बंद होणार आहे. या प्रकारामुळे गावकरी चिंतेत सापडले असल्याने हा मार्ग बंद करण्यात येऊ नये, यासाठी निर्माणी प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सांगण्यात आली. या पत्रकार परिषदेत भीमराव कुमरे ग्रामपंचायत सदस्य प्रेमदास मडावी, गजानन पोराते, सुनील कुसनाके, गजानन मडावी, विजय मडावी, सविता कुमरे, ताईबाई पोराते, खुशाल मडावी, शंकर आळेकर, आकाश मळावी, बंडू आळे व गावकरी उपस्थित होते.

बॉक्स

मार्गच बंद केला तर गावकरी जाणार कुठून?

पिपरबोडी गावकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी एक मात्र गावासमोरील प्रवेशद्वार आहे. त्यामुळे भद्रावती आयुध निर्माणी वसाहतीकडे जाण्याचा मार्ग हाच एकमेव आहे. हा जर मार्ग बंद करण्यात आला तर गावातील मागील भागात कर्नाटक एम्टा कंपनीचे ग्रीन प्लॅन पिपरबोडी वस्तीला लागून आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल झाले असून येथे वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्र प्राण्याचे वावर आहे. त्यामुळे या मार्गाने भद्रावतीकडे जाणे शक्य नसल्याने एकमात्र असलेले प्रवेशद्वार बंद झाल्यास गावकरी कुठून जाणार, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

Web Title: The only way to reach Piperbodi village is to close the ordnance factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.