८४ वर्षांपासून सावरगावात एकच गणपती
By Admin | Updated: September 9, 2016 00:51 IST2016-09-09T00:51:21+5:302016-09-09T00:51:21+5:30
गावातील विवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे.

८४ वर्षांपासून सावरगावात एकच गणपती
गाव अस्सल राजकीय : मात्र उत्सवात एकीचे दर्शन
घनश्याम नवघडे नागभीड
गावातील विवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे. मात्र नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे ही संकल्पना ८४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील अशी ओळख असलेल्या या गावात ही संकल्पना राबविली जात असल्याने गावाचे कौतुक केले जात आहे.
‘सार्वजनिक गणपती मंडळ’ असे या सावरगावच्या गणपती मंडळाचे नाव आहे. १९३२ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. १९३२ ते २०१५ या ८४ वर्षाच्या कालावधीत या मंडळाचे केवळ तीन अध्यक्ष झाले, हे आणखी एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पहिले अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग बोरकर हे होते. ते जवळपास ३० वर्ष अध्यक्ष होते. नंतर रामकृष्ण चिरकुटा सहारे अध्यक्ष झाले. आता मोरेश्वर कुकसू ठिकरे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
खरेतर सावरगावची ओळख राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव म्हणून तालुक्यात आहे. चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावात राजकीय कलगीतुरे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झडतात की त्याची चर्चा अख्ख्या तालुक्यात होते. निवडणुक कोणतीही असो, निवडणुक आली की दोन ध्रृवावर दोघे, अशी या गावाची विभागणी होऊन जाते. सावरगावची ग्रामसभा तर अनेकदा वादाचा विषय होत असते. अनेकदा पोलीस ठाण्यापर्यंत ती पोचली आहे.
राजकीयदृष्ट्या सावरगावची अशी पार्श्वभूमी असली तरी गणपती उत्सवाच्या वेळी मात्र संपूर्ण सावरगाव एक होऊन जाते. गणपती उत्सव संपूर्ण गावाचा होऊन जातो. गावात राजकीय मतभेद कितीही आणि काहीही असोत, पण यावेळी या मतभेदांना मुळीच थारा नसतो. ते १० दिवस कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचारच केला जात नाही. शेवटचे दोन दिवस तर गावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जातो. या दोन दिवसात कोणीही कामावर किंवा शेतावर जात नाही. शेवटच्या दिवशी गावात महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
केवळ गावकरीच नाही तर पंचक्रोशीतील नागरिकही या महाप्रसादाचा लाभ घेत असतात.