मंडई उरली फक्त बाजार व नाटकापुरती
By Admin | Updated: November 9, 2016 02:03 IST2016-11-09T02:03:19+5:302016-11-09T02:03:19+5:30
काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण ग्रामीण भागत दिवाळीच्या मुहूर्तावर भरत असलेल्या मंडईमध्ये आता म्हणावा तेव्हढा जीव उरला नाही.

मंडई उरली फक्त बाजार व नाटकापुरती
प्रेक्षक घटले : दंडार ग्रामीण लोककलेला ग्रहण
तळोधी (बा) : काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण ग्रामीण भागत दिवाळीच्या मुहूर्तावर भरत असलेल्या मंडईमध्ये आता म्हणावा तेव्हढा जीव उरला नाही. मंडईची जगा आता नाटके आणि बाजारांनी घेतली असून भविष्यात या लोककलेचे काय होईल अशी चिंता अनेकांना सतावत आहे.
नागभीड लगत असलेल्या नवेगाव, पांडव, कोर्धा, पळसगाव (खुर्द), नांदेड, तळोधी या भागात मंडई उत्सव पार पाडला जातो. या ठिकाणी मंडईमध्ये दंडार मंडळांनी उपस्थितीबाबत जी उदासीनता दाखविल्या जाते ती फार चिंताजनक बाब असल्याचे दिसून येते.
एक-दोन वर्षापूर्वी मंडई म्हटले की एक वेगळाच उत्साह असायचा, मंडईमध्ये आपल्या गावच्या दंडार मंडळास भाग घ्यायचा आहे म्हणून १५ दिवस अगोदर पासून दंडारीची तयारी सुरू व्हायची मंडईच्या आदल्या दिवशी रंगीत तालीम म्हणून गावात ‘भडकी दंडार’ सादर व्हायची तत्पूर्वी ज्या गावात मंडईचे आयोजन होते ती आयोजक मंडळी ज्या गावात दंडार मंडळे आहेत अशा गावात जावून मंडळास बुक्का किंवा सुपारी पोचती करायचे. मंडळाने बुक्का किंवा सुपारी स्वीकारली म्हणजे सदर दंडार मंडळ मंडईत भाग घेण्यास कटीबद्ध झाला असे समजण्यात येईल. मंडईच्या दिवशी मंडई उत्सवात किमान दहा ते १५ दंडार मंडळे भाग घेवून परंपरेने चालत आलेल्या लोककलेचे लोकगिताचे ग्रामीण भागात दर्शन घडवत असत. पण हे दिवस आता संपल्यासारखे दिसत आहेत. दंडार मंडळे आता दिसेनाशी झाली आहेत. त्यांची जागा आता केवळ बाजार आणि नाटकांनी घेतली आहे. ज्या गावात मंडईचे आयोजन असते तेथे एक किंवा दोन नाटकांचे आयोजन निश्चित असते. पूर्वीही मंडईच्या दिवशी नाटके होत होती. पण ती गावातील कलावंतांनी तयार केलेले पण हल्ली गावातील नाट्य मंडळेसुद्धा ‘भूमीगत’ झाली आहेत. हल्ली जी नाटके प्रस्तुत होत आहेत ती बाहेरच्या नाट्यसंस्थांची आहेत. काळाच्या ओघात गावातील दंडार आणि नाट्यमंडळे लोप पावत असून ग्रामीण लोककलेच्या दृष्टीने हे निश्चितच घातक आहे. (वार्ताहर)