चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, याचा फटका शाळा, महाविद्यालयालाही बसला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या आहे. मात्र, अजूनही त्या पूर्वपदावर आल्या नाही. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना अद्यापही सुटीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे घरपोहोच पोषण आहार पुरविला जात आहे. मात्र, यामध्ये केवळ कडधान्यच दिले जात असून तेल, तिखट यातून गायब झाले आहे.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार दिला जातो. या माध्यमातून कुपोषणावर मात करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे या आहारात सर्व प्रकारचे कडधान्य तसेच अन्य पदार्थही विद्यार्थ्यांना दिले जातात. शाळा सुरू असताना माध्यान्ह सुटीमध्ये त्यांना हा आहार शिजवून पुरविला जात होता. मात्र, कोरोनामुळे यावर्षी अद्यापही शाळा पूर्वपदावर आल्या नाहीत. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोषण आहार पुरविला जात आहे. यामुळे गरीब तसेच गरजू विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ, चणा, मसूर डाळ पुरविण्यात आली आहे. मात्र तेल, तिखट दिलेच जात नसून, डाळीमध्येही मटकी, मूग यापैकी काहीही पुरविले जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
-
पोषण आहाराचे प्रमाण
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार दिला जातो. यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर ग्रॅम तांदूळ प्रती दिवस, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १५० ग्रॅम तांदूळ दिला जातो. कडधान्य शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांना पुरविले जाते.
कोट
शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना दरमहा शालेय पोषण आहार घरपोहोच पुरविला गेला. आता हळूहळू शाळा सुरू होत आहे. त्यामुळे भविष्यात शाळांमध्येच मध्यान्ह भोजन दिले जाणार आहे.
- विशाल देशमुख
अधीक्षक, शालेय पोषण आहार.