The only answer to all problems is education | सर्व समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे शिक्षण

सर्व समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे शिक्षण

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगातल्या सर्व समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे शिक्षण. अनेक समस्यांच्या निराकरणाचा हा रामबाण उपाय आहे. गेली ५ वर्षे जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी मंत्री म्हणून मी प्रयत्नांची शर्थ केली. यापुढे आमदार म्हणून विधीमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून विद्यार्थी विकासाला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथे तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समितीच्या सभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुद्धलवार, पंचायत समितीचे उपसभापती सोमेश्वर पद्मगिरीवार, जि. प. सदस्य अ‍ॅड. हरीश गेडाम, माजी सभापती गोविंद पोडे, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, कोर्टीमक्ताचे सरपंच गोविंद उपरे उपस्थित होते. आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. सांघिक भावना या माध्यमातुन विकसित होते. जिल्ह्यातील अनेक समस्यांची सोडवणूक गेल्या ५ वर्षात मंत्री म्हणून करू शकलो याचा मला आनंद आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन या दोन दिवशी आपण भारत माता की जय म्हणतो. मात्र उर्वरित ३६५ दिवस हिच कृती सातत्याने करण्याची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहावे, आदर्श विद्यार्थी जिल्ह्यात घडावे यादृष्टीने मिशन शक्ती, मिशन सेवा असे अनेक उपक्रम गेल्या ५ वर्षांत आम्ही राबविले. यापुढील काळातही ही प्रक्रिया अधिक सक्षम व सदृढ व्हावी यावर आपला भर राहील, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जि. प. सदस्य संध्या गुरनुले व अन्य मान्यवरांची भाषणे झालीत. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 

Web Title: The only answer to all problems is education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.