केवळ ४८ टक्के पेरणी
By Admin | Updated: July 17, 2017 00:33 IST2017-07-17T00:33:53+5:302017-07-17T00:33:53+5:30
जुलै महिना अर्धा संपला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

केवळ ४८ टक्के पेरणी
कृषी विभागाचा अहवाल : समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुलै महिना अर्धा संपला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेकांची पेरणीची कामे खोळंबली असून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ४८ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
कृषी विभागाने यावर्षी चार लाख ७६ हजार ३०० हेक्टरवर खरीप पीक पेरणीचे नियोजन केले होते. शेतकऱ्यांना बियाणे व खतासाठी अडचण निर्माण होवू नये, यासाठी बियाणे उपलब्ध करून देत खताचे आवंटन मंजूर करून घेतले. मात्र ऐन पेरणीच्या तोंडावर पावसाने दगा दिला. ज्या शेतकऱ्यांनी धुळ पेरणी केली त्यांचे बियाणे पावसाअभावी उगवलेच नाही. त्यामुळे त्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. अशातच अद्यापही जिल्ह्यात समाधानकार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत केवळ ४८.३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११३५ मिमी आहे. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २४८.३४ मिमी पाऊस झाला आहे. सध्या पेरणीची कामे जोमाने सुरू असून चार पुढील आठ ते दहा दिवसांत ८० ते ९० टक्के पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात पेरणीचे ४ लाख ३८ हजार २०२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून ११ जुलैपर्यंत २ लाख ११ हजार ८३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सोयाबीन १ लाख ४० हजार ३८८ हेक्टर क्षेत्रापैकी ५५ हजार ५२५ हेक्टरवर पेरणी झाली असून कापूस, धान आदी पिकांची पेरणी केवळ ५० टक्के झाली आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.