साईंनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाइन अभ्यासक्रमाचा पर्याय समोर आला. पहिल्या वर्गापासून तर वरच्या वर्गापर्यंत विद्यार्थी स्मार्ट फोन, ऑयपॅड, संगणकाचा वापर करीत आहेत. मात्र डोळ्यांची निगा राखण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे डोळ्यांच्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास करा, मात्र डोळ्यांची काळजी घ्या, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. मात्र ऑनलाइन अभ्यासक्रमात मोबाइलचा अतिवापर आजारांना आमंत्रण देत आहे. पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल खरेदी करून दिला आहे. कमी वयामध्ये मुलेही स्मार्टफोन सहज हाताळत आहे. मात्र आता ते धोकादायक ठरत आहे. अगदी लहान वयातच मुलांना नंबरचे चष्मे लागत आहे. मोबाइलमुळे मुलांची झोप कमी होत असून, त्यांच्या स्वभावात चिडचिडपणा वाढत आहे. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच मोबाइल, लॅपटाॅपचा वापर करणे गरजेचे आहे. केजी, नर्सरीचे विद्यार्थीही हातात मोबाइल घेऊन फिरताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डोळे सुजणेसतत मोबाइल स्क्रीनवर बघितल्यामुळे लहान मुलांना अधिक त्रास होतो. त्यामुळे १५ ते २० मिनिटांनी डोळ्यांना आराम द्यावा. डोळ्यांना सतत चालू बंद करावे, थकवा आल्यास स्क्रीनकडे न बघता दूरवर एखाद्या वस्तूकडे बघावे. दूरपर्यंत नजर जाईल अशा रितीने बघितल्यास डोळ्यांना आराम मिळेल.
डोकेदुखीसतत मोबाइलच्या वापरामुळे लहान मुलांना डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांची झोपही बरोबर होत नाही. त्यांच्या एकूणच हालचालीवर परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली
ऑनलाइन अभ्यासाच्या नावाने लहान मुलांसह काॅलेज तरुणही तासन्तास मोबाइल बघतात. अंधारामध्येही मोबाइल पाहण्याचे प्रमाण अधिक आहे. सतत स्क्रीन बघितल्यामुळे मुलांमध्ये डोळ्यांचे दोष निर्माण होत आहे. त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोके दुखणे, डोळे सुजणे असे प्रकार समोर येत आहेत. याचे परिणाम भविष्यात उद्भवण्याची शक्यता आहे. स्क्रीनच्या प्रकाशामुळे, किरणांमुळे केवळ त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो असे नाही तर जीवनाच्या इतर चक्रावरही दुष्परिणाम होऊन रात्रीची झोपही कमी होण्याची शक्यता असते.
पालकही चिंतीत
कोरोना संकटामुळे विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करीत आहेत. त्यामुळे मुलांना मोबाइल देणे आवश्यक झाले आहे. तासन्तास मुले मोबाइल हाताळत असल्यामुळे आता डोळ्यांचे तसेच इतरही आजार होत आहे. त्यामुळे शासनाने शाळा सुरू करून ऑनलाइन अभ्यास बंद करावा. - दिनेश कोटनाके पालक
मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहे. त्यामुळे मुलांचे अभ्यासातून लक्ष उडाले आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र हा अभ्यासक्रम एकूणच धोकादायक ठरत आहे. कोरोना संकट कमी झाल्यामुळे शाळा सुुरू करणे हाच एकमेव पर्याय आहे. - चेतन कोडापे पालक
प्रत्येकांच्या डोळ्यांना नैसर्गिक प्रोटेक्शन असतात. मात्र कोणत्याही गोष्टींचा अतिवापर हा धोकादायकच असतो. मोबाइल, लॅपटाॅपमध्ये आवश्यकतेनुसार ब्राइटनेस ठेवावा. डोळ्यांना थोड्या-थोड्या अंतराने चालू बंद करावे. पंधरा-वीस मिनिटे सतत स्क्रीनवर काम केल्यानंतर दूरवर बघण्याचा प्रयत्न करावा. काही क्षणासाठी डोळ्यांना मिटून डोळ्यांना आराम द्यावा, -चेतन खुटेमाटे, नेत्ररोग तज्ज्ञ, चंद्रपूर