एक वर्षापासून वनविभागाचे मजूर पगारापासून वंचित
By Admin | Updated: August 3, 2016 01:54 IST2016-08-03T01:54:46+5:302016-08-03T01:54:46+5:30
वनविकास महामंडळाचे झरण क्षेत्रातील कक्ष क्र.१३२ व १६ मध्ये काम केलेल्या मजुरांची मजुरी वर्षभरापासून देण्यात आलेली नाही.

एक वर्षापासून वनविभागाचे मजूर पगारापासून वंचित
मजूर त्रस्त : कन्हारगाव वनक्षेत्रातील प्रकार
कोठारी : वनविकास महामंडळाचे झरण क्षेत्रातील कक्ष क्र.१३२ व १६ मध्ये काम केलेल्या मजुरांची मजुरी वर्षभरापासून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मजुरांत नाराजी व संताप पसरला आहे.
मध्य चांदा वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हारगाव वनक्षेत्रातील कक्ष क्र. १३२ मध्ये आॅक्टोबर २०१५ ला २५ हेक्टरचे डिर्माकेशन करण्यात आले. तसेच कक्ष क्र. १६ मध्ये १०० टक्के मोजणीची कामे मजुरांकडून करण्यात आले. सदर कामाची देखरेख वनरक्षक सिंगम यांच्याद्वारे केली होती. काम पूर्ण होवून वर्ष संपत आहे. तरीही मजुरांची मजुरी अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेली नाही. याबाबत मनोज बावणे, चेतन दुर्गे, राहूल वनकर, रविंद्र कोहळे, पंकज पेन्दोर व बंडू बोरकर या मजुरांनी सहायक व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ तसेच वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे यांच्याकडे विचारणा केली असता, सदर कामाचे पैसे वनरक्षक सिडाम यांना काम संपताच देण्यात आले. मात्र त्यांनी मजुरांना मजुरी दिली नाही. ही बाब गंभीर असून संबंधित वनरक्षकास विचारणा करून त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येवून मजुरांना त्वरित मजुरी देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
याबाबत वनरक्षक सिंगम यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवी करुन संबंधित कामाचे पैसे मिळाल्यानंतर मजुरांना मजुरी देण्यात येईल. त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार अन्यथा ‘तुम्हाला जमेल ते करा, मी सर्व चौकशीस पुढे व कारवाईस पुढे जाण्याची तयारी’ असल्याचे सांगितले. (वार्ताहर)