एक हजार अंगणवाड्या डिजीटल करणार
By Admin | Updated: January 21, 2016 01:11 IST2016-01-21T01:11:05+5:302016-01-21T01:11:05+5:30
जिल्ह्यातील एक हजार अंगणवाड्या डिजीटल करणार असून त्यासोबतच प्रत्येक अंगणवाडीला जिल्हा परिषदेकडून लहान ट्रांजीस्टर रेडीओ देण्यात येणार आहे.

एक हजार अंगणवाड्या डिजीटल करणार
महेंद्र कल्याणकर : गोपालपूर व कुकुडसा अंगणवाडीला आयएसओ नामांकन
चंद्रपूर : जिल्ह्यातील एक हजार अंगणवाड्या डिजीटल करणार असून त्यासोबतच प्रत्येक अंगणवाडीला जिल्हा परिषदेकडून लहान ट्रांजीस्टर रेडीओ देण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांच्या सर्वांगीण विकास साधण्याकरिता जे काही जिल्हा परिषदेकडून करता येईल, ते आम्ही करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी केले.
जिल्हा परिषद कन्नमवार सभागृहात आयोजित आयएमओ मानांकन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समिती सभापती सरिता कुडे, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य अल्का आत्राम, अंबुजा फाऊंडेशनचे सोपान नागरगोजे, आयएसओ सल्लागार नितीन वैद्य, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहीते उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोरपना तालुक्यातील गोपालपूर व कुकुडसा या दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन दर्जा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.
महेंद्र कल्याणकर पुढे म्हणाले, शासनातर्फे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गरोदर मातांना एक वेळचा सकस चौरस आहार देण्याबाबत काम ११५ अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अनुसुचीत क्षेत्रातील कुपोषीत प्रमाण कमी असून याचा लाभ गावातील प्रत्येक गरोदर मातांना मिळाला पाहिजे, याकरीता प्रयत्न करावे. तसेच लहान बालकांचा सर्वांगीण विकास कसे करता, येईल याकडे अंगणवाडी सेविकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सभापती देवराव भोंगळे यांनी, जिल्ह्यातील गोपालपूर व कुकुडसा या दोन अंगणवाड्यांना जसे आयएसओ मानांकन मिळाले तसेच आपल्या प्रत्येक अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळाले पाहिजे, याकरीता प्रत्येक अंगणवाडीसेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रयत्न करावे. गावातील अंगणवाडी केंद्र म्हणजे बाल प्रशिक्षण केंद्र व बालसंस्कार केंद्र असते. या अंगणवाडीतूनच उद्याचे भविष्य घडत असते, असे सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्षा कल्पना बोरकर म्हणाल्या, समाजातील लहान बालकांना संस्कारमय करून त्यांना समाजात उभे राहण्याची ताकद ही अंगणवाडी केंद्रच देत असते. प्रत्येक वेळी शासनाच्या मदतीवर अवलंबून राहण्यापेक्षा गावातील लोकांना एकत्र आणून लोकवाट्यातून अंगणवाडी बोलकी करून आयएसओ करण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या कोऱ्या पाटीवर संस्कार घडवणारी कामे अंगणवाडी सेविका करत असते. त्यांनी दर महिन्याला गावात महिलांचे कार्यक्रम घेऊन वेगवेगळ्या विषयावर त्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)