एकीकडे वृक्षलागवड तर दुसरीकडे झाडांची कत्तल
By Admin | Updated: July 11, 2017 00:28 IST2017-07-11T00:28:28+5:302017-07-11T00:28:28+5:30
मराठीत एक म्हण आहे, ‘जिथे विकास तेथे भकास’ या म्हणीची प्रचिती भद्रावती येथील जुन्या भाजी मार्केटकडे नजर मारली असता दिसते.

एकीकडे वृक्षलागवड तर दुसरीकडे झाडांची कत्तल
शतकोत्तरी चार निमवृक्ष नष्ट : भाजीबाजार इमारतीचे खोदकाम
लोकमत न्यूज नेटवर्क
आयुध निर्माणी (भद्रावती) : मराठीत एक म्हण आहे, ‘जिथे विकास तेथे भकास’ या म्हणीची प्रचिती भद्रावती येथील जुन्या भाजी मार्केटकडे नजर मारली असता दिसते. नगर पालिकेने जुन्या भाजी मार्केटच्या ठिकाणी भाजी बाजार उभारण्यासाठी शेकडो वर्षांपासून डौलाने उभी असणारी विशालकाय निमवृक्षाची चार झाडे तोडल्याने ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ याचा अनुभव भद्रावतीकर घेत आहेत. एकीकडे वृक्ष लागवडीची मोहिम जोमात असताना शतकोत्तरी चार वृक्ष तोडल्याने वन्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी शहर विकासासाठी विविध योजना भद्रावती येथे राबविणे सुरू केले आहे. शहराची भाजी मार्केटची गैरव्यवस्था लक्षात घेता, त्यांनी भाजी व्यापारी इमारत बांधण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी आणला. जुन्या भाजी मार्केटला भाजीपाला विकणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व दुकानदारांना व तेथे अन्य व्यवसाय करणाऱ्या इतर दुकानदारांनाही शेजारीच किरायाने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. नियोजित व्यापारी संकुलाच्या निर्मितीस्थळी अंदाजे १०० वर्षांपासून निंबाची विशालकाय चार झाडे होती. ज्यांच्या विस्तीर्ण सावलीत सर्वजण विसावा घ्यायचे. डौलाने शेकडो वर्षांपासून उभी असलेल्या या झाडांमुळे इमारत बांधकामात अडचणी येत होत्या. त्यामुळे नाईलाजास्तव प्रशासनाने अखेर या निमवृक्षावर करवत चालवली. शहराच्या विकासासाठी वयाची शंभरी पार केलेल्या या विशाल वृक्षांना आपला बळी द्यावा लागला. त्यामुळे भद्रावतीकरांच्या मनात एवढे प्राचीन वृक्ष गमावल्याची हूरहूर आहे. पण दुसरीकडे शहराला अद्यावत भाजी बाजार मिळणार ही आसही आहे. ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ म्हणतात, तेच खरे. याची प्रचीती भद्रावतीकर याची देही याची डोळा घेत आहेत.