जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एक ठार
By Admin | Updated: July 30, 2015 01:06 IST2015-07-30T01:06:46+5:302015-07-30T01:06:46+5:30
बैलबंंडीने शेतात जात असताना रस्त्यावर जिवंत विद्युत तार तुटून पडली होती. या ताराला स्पर्श झाल्याने शॉक लागून बैल बंडीवरील एक इसम व बैल ठार झाला.

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एक ठार
बैलाचाही मृत्यू : दोन जण जखमी, वरोरालगतच्या एकार्जुना शिवारातील घटना
वरोरा : बैलबंंडीने शेतात जात असताना रस्त्यावर जिवंत विद्युत तार तुटून पडली होती. या ताराला स्पर्श झाल्याने शॉक लागून बैल बंडीवरील एक इसम व बैल ठार झाला. तर बैल बंडीवरस्वार दोन व्यक्तीही विद्युत शॉक लागल्याने जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वरोरा शहरानजीकच्या एकार्जुना शिवारात घडली.
देवीदास कवडू बोरकुटे (५०) रा. बावणे लेआऊट वरोरा असे मृताचे नाव आहे. एकार्जुना येथील उत्तम थेरे यांच्या शेतात बुधावरी सकाळी देविदास बोरकुटे हे बैलबंडीने जात होते. बैलबंडीवर शिला थेरे व विनोद जीवतोडे बसले होते. रस्त्यावर जिवंत विद्युत तार तुटून पडली होती. सर्वप्रथम बैलाला विद्युत शॉक लागल्याने बैल तडफडू लागल्याने देवीदास बोरकुटे यांनी बैलबंडीवरुन उडी घेतली. तेव्हा देविदासच्या हाताला विद्युत तारेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक बैलही मृत्यू पावला. याचवेळी बैलबंडीवर असलेले शिला थेरे व विनोद जीवतोडे यांनाही विजेचा सौम्य धक्का लागला. त्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मृताच्या वारसांना मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, देविदास ताजणे यांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळावर तणाव निर्माण झाला. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळाला भेट देवून उपस्थितांशी चर्चा करून मृताच्या परिवारास तातडीची आर्थिक मदत दिली. मृताच्या वारसांना वीज वितरण कंपनीकडून आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मिळाल्याने मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)