सिद्धार्थ संभा बनकर (५०) रा. कालेता असे मृतकाचे नाव आहे तर गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव रोशन मनोहर मडकाम (२९) रा. रेंगातूर असे आहे.
गुरुवारी सकाळी दोघेही मोटरसायकलने कालेता येथून ब्रम्हपुरीला यायला निघाले. चांदली आणि कहालीदरम्यान असलेल्या निर्मला माता मंदिराजवळील नागमोडी वळणावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णतः चेंदामेंदा होऊन मृताचे डोके धडापासून वेगळे झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. गंभीर जखमी झालेल्या इसमाच्या दोन्ही पायाला जबर दुखापत झाली असून एक पाय तुटला आहे. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्वरित गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर अपघाताची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश उंदिरवाडे, अरुण पिसे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.