चंद्रपूर परिमंडळातील दीड लाख वीज ग्राहकांनी भरले ३६ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:18+5:30
एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्याने राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापरामुळे देण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असल्याने ग्राहकांचा वीज वापर नेहमीपेक्षा जास्त असतो. परंतु यावेळी लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरी होते. परिणामी टीव्ही, पंखा, एअर कंडीशन, फ्रीझ, लॅपटॉप, संगणकाचा वापर वाढला होता.

चंद्रपूर परिमंडळातील दीड लाख वीज ग्राहकांनी भरले ३६ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन काळात महावितरणने सरासरी आकारणी करून देयके पाठविल्याने काही ग्राहकांमध्ये नाराजी पसरली. याच प्रश्नावरून जिल्ह्यातील राजकीय व विविध संघटनांकडून निवेदने देवून देयक कमी करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमी चंद्रपूर परिमंडळातील एक लाख ४० हजार ग्राहकांनी १ ते ९ जुलैपर्यंत ३६ कोटी ४८ लाखांचे वीज बिल भरले. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांकडून वीज बील माफ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दररोज निवेदन देणे सुरू असताना जिल्ह्यातील ८६ हजार ६२ ग्राहकांकडून २६ कोटी १८ लाखांचा वीज बील भरणा केला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना ग्राहकांनीच चपराक दिल्याचे मानले जात आहे.
महावितरणाचे चंद्रपूर परिमंडळात २ लाख ७ हजार ग्राहक आहेत. लॉकडाऊननंतर जून महिन्यात प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतल्यानंतर दिलेले वीज बील अचूक असल्याबाबत ऊर्जा मंत्र्यांच्या निर्देशानुसार महावितरणच्या सर्व परिमंडळातील ग्राहकांशी संवाद साधून वीज बिलाची माहिती दिली. राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्य विद्युत नियामक आयोगाने या काळात महावितरणसह, राज्यातील सर्व वीज वितरण कंपनींना कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून मीटर रिडींग न घेता सरासरी रिडींगप्रमाणे ग्राहकांना वीज बिल देण्याबाबत निर्देश दिले होते. एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्याने राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापरामुळे देण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असल्याने ग्राहकांचा वीज वापर नेहमीपेक्षा जास्त असतो. परंतु यावेळी लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरी होते. परिणामी टीव्ही, पंखा, एअर कंडीशन, फ्रीझ, लॅपटॉप, संगणकाचा वापर वाढला होता. जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल होताच प्रत्यक्ष मीटर रिडींग जूनमध्ये घेण्यात आले. त्यावेळी एप्रिल व मे महिन्याचे एकत्रित रिडींगची नोंद झाली. त्यानुसार सरासरी प्रमाणे दिलेले वीज बिल रिडींग वजा करून राहिलेले बिल देण्यात आले.
शिवाय तीन महिन्यांचा स्लॅब बेनिफीटही ग्राहकांना देण्यात आला आहे. काही ग्राहकांनी एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीज बिल ऑनलाईन भरले. परंतु काहींनी एप्रिल व मे महिन्यांचे वीज बील कॅश कलेक्शन सेंटर बंद असल्याने भरले नव्हते. त्यामुळे संबंधित ग्राहकांना जूनमध्ये वीज बिलाची थकबाकीची रक्कम जोडून आल्याने वीज बिलाचा आकडा अधिक दिसून आल्याचे महावितरण चंद्रपूर परिमंडळकडून सांगण्यात आले.
तीन महिन्यांचा स्लॅब बेनिफीटही ग्राहकांना देण्यात आला आहे. काही ग्राहकांनी एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीज बिल ऑनलाईन भरले. परंतु काहींनी वीज बील लॉकडाऊनमुळे भरले नव्हते. सरासरी वीज बील संदर्भात तक्रारी आल्यास निरसन केले जात आहे. यासाठी विशेष कक्ष तयार करण्यासोबतच ऑनलाईन वेबिनार सुरू आहे. त्यामुळे बील भरणाऱ्यांची संख्या वाढली. पाठविलेले बील योग्य असल्याने ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- सुनील देशपांडे, कार्यकारी अभियंता,
महावितरण परिमंडळ, चंद्रपूर