संत गाडगेबाबा सभागृहात ओली पार्टी
By Admin | Updated: September 1, 2014 23:28 IST2014-09-01T23:28:45+5:302014-09-01T23:28:45+5:30
संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली. त्यांच्या नावाने पंचायत समिती परिसरात बनविण्यात आलेल्या सभागृहात ग्रामसेवकांनी ओली पार्टी केली. एवढेच नाही तर शिल्लक राहिलेले

संत गाडगेबाबा सभागृहात ओली पार्टी
ग्रामसेवकांकडून संतांचा अवमान : ब्रह्मपुरी पंचायत समितीतील प्रकार
ब्रह्मपुरी : संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली. त्यांच्या नावाने पंचायत समिती परिसरात बनविण्यात आलेल्या सभागृहात ग्रामसेवकांनी ओली पार्टी केली. एवढेच नाही तर शिल्लक राहिलेले अन्न नालीत फेकून दिले. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. किमान या सभागृहात तरी ग्रामसेवकांकडून असा प्रकार अपेक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
येथील काही ग्रामसेवकांची बदली झाली. त्यांना निरोप देण्याकरिता समारंभाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या समारंभात अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे, महिला कर्मचारी उपस्थित असतानाही काहींनी मद्यप्राशन करीत ओल्या पार्टीचा आनंद लुटला.
तत्पूर्वी दुपारी ३ वाजता प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षक म्हणून बाहेरील पाहुणे उपस्थित होते. सदर प्रशिक्षणानंतर लगेच सहभोजन ठेवण्यात आले. भोजनात साध्या जेवनासह मासांहारी जेवणही देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाला संवर्ग विकास अधिकारी तोडेवार हे सुद्धा उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या भोजनात काही आंबटशौकीनांनी मद्यप्राशन करून मासांहारावर ताव मारला. निरोप समारंभात महिलाही उपस्थित होत्या.
संत गाडगेबाबा सभागृहाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले असून स्वातंत्र्यदिनी उद्घाटन झाले. याच सभागृहात मद्य व मासांहाराचे जेवन ठेवण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, जेवण झाल्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न पंचायत समितीच्या समोरील मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेल्या नालीत फेकण्यात आले.सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्याने ओरड केली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नालीतील अन्न काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)