मुलाची जात सिद्ध करण्यासाठी वृद्धाची पायपीट
By Admin | Updated: October 9, 2015 01:41 IST2015-10-09T01:41:17+5:302015-10-09T01:41:17+5:30
सद्यस्थितीत नोकरी दुर्लभ झाली आहे. ती एखाद्याला नशिबानेच मिळते. मोहाळी येथील एका युवकाला ती मिळाली.

मुलाची जात सिद्ध करण्यासाठी वृद्धाची पायपीट
नागभीड: सद्यस्थितीत नोकरी दुर्लभ झाली आहे. ती एखाद्याला नशिबानेच मिळते. मोहाळी येथील एका युवकाला ती मिळाली. नोकरीवर तो रुजुही झाला. पण नोकरीवर लागलेल्या त्या मुलाची ‘जात’ सिद्ध करण्यासाठी त्याचा वृद्ध पिता तीन महिन्यांपासून जीवाचा आटापिटा करीत असला तरी अपयशच याच्या पदरी येत आहे.
रामकृष्ण हिरामण ऊईके असे वृद्धाचे नाव असून तो नागभीड तालुक्यातील मोहाळी (मोकासा) येथील रहिवासी आहे. रामकृष्णला दोन मुले असून त्यातील एकाला नुकतीच सरकारी नोकरी लागली. नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्याला इतर कागदपत्रासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश हाती पडताच मुलाने वडिलांना याविषयी कळविले.
दैव योगाने मुलाला नोकरी मिळाल्याने वडीलही कामाला लागले. रामकृष्णाने त्यांच्याच एका नातेवाईकाची जातपडताळणी झाली असल्याने त्यांचेच कागदपत्र जोडून केस फाईल केली. पण संबंधित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण नामंजूर केले व तुमच्याच वडील-आजोबाचा १९५० पूर्वीचा सबळ पुरावा जोडा, असे सांगण्यात आले.
आता १९५० पूर्वीच्या सबळ पुराव्यासाठी रामकृष्णाची सारखी पायपीट सुरुआहे. त्यांच्या पूर्वजाना शेती नसल्याने पी वन मिळत नाही. वडिलांनी आतापर्यंत आपला मुक्काम तीन गावांत हलविला. त्या तीनही गावांचे त्यांनी रेकॉर्ड तपासले. पण घरात कोणीच शाळेची पायरी चढली नसल्याने कोणताही पुरावा त्यांना मिळाला नाही.येथील तहसील कार्यालय, कलेक्टर आॅफीस, पंचायत समिती, पोलीस ठाणे, भूमी अभिलेख कार्यालय, आदी सर्व कार्यालये त्यांनी पालथी घातली आहेत. पण सबळ पुरावा त्यांना मिळत नाही. ते हतबल झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)