नवीन पुलाच्या पिचिंगसाठी जुन्या दगडाचा वापर
By Admin | Updated: May 16, 2017 00:33 IST2017-05-16T00:33:13+5:302017-05-16T00:33:13+5:30
मूल तालुक्यातील भेजगावजवळील उमा नदीवर दहा कोटी रुपये खर्च करुन मोठ्या पुलाची निर्मिती गतवर्षी करण्यात आली.

नवीन पुलाच्या पिचिंगसाठी जुन्या दगडाचा वापर
कंत्राटदाराची मनमानी : जुन्या पुलातील दगड काढून त्याचा पुनर्वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव: मूल तालुक्यातील भेजगावजवळील उमा नदीवर दहा कोटी रुपये खर्च करुन मोठ्या पुलाची निर्मिती गतवर्षी करण्यात आली. या पुलाच्या दोन्ही किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहाने रस्ता खचून जाऊ नये म्हणून दगडाची पिचींग सुरु आहे. या पिचींगसाठी नवीन दगड वापरणे गरजेचे असताना कंत्राटदार मात्र लाखो रुपये वाचवून जुन्या लहान पुलाचे काम जेसीबीने खोदून तेथील दगड मोठ्या पुलात पिचींगसाठी वापरत आहे.
भेजगाव परिसरातील पंधरा गावांना लहान पुलामुळे पावसाळ्यात तालुक्याचा संपर्क तुटत होता. सदर रस्ता जिल्हा परिषदेकडे असल्याने अनेक वर्षापासून पुलाची समस्या होती. मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांची समस्या व पुलाची मागणी लक्षात घेवून मूल- भेजगाव - बेंबाळ हा रस्ता बांधकाम विभागाकडे परावर्तीत करुन या ठिकाणी एका वर्षात नवीन पुलाची निर्मिती केली. कंत्राटदाराने अवघ्या सहा महन्यिात काम पूर्ण करुन शाबासकीही मिळविली. असे असले तरी त्याच्या मनमानी कारभाराने ग्रामस्थ मात्र त्रस्त झाले. जुने पूलच पोखरुन दगड काढल्याने भविष्यात अंत्यविधी करायची कुठे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे.
भेजगाव, येसगाव येथील नागरिक याच लहान पुलावरुन अंत्यविधी नदीपात्रात करतात. मात्र कंत्राटदाराने लहान पुलावरुन नदीपात्रात उतरण्याचे ठिकाणच जेसीबीने पोखरुन टाकल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी जाताना अडचण निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांचे हाल होत असल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. संबंधित कंत्राटदाराचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक साटेलोटे असल्याने अधिकारी या कामाकडे फिरकतही नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नवीन पुलाच्या पिचींगसाठी लाखो रुपये मंजूर आहेत. मात्र या कामात जुन्याच दगडाचा वापर करुन कंत्राटदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे दिसून येते. या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.