जिल्हा परिषदेने साकारली जुन्या कपड्यांची बँक
By Admin | Updated: October 26, 2016 00:58 IST2016-10-26T00:58:55+5:302016-10-26T00:58:55+5:30
आजही बऱ्याच गरीब कुटूंबातील महिला, पुरुष, लहान मुले, म्हातारी माणसे अठराविश्वे दारिद्र्यात असून अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचीत आहे.

जिल्हा परिषदेने साकारली जुन्या कपड्यांची बँक
सीईओंचा पुढाकार : गोरगरीब जनतेला कपडे वाटप करणार
चंद्रपूर : आजही बऱ्याच गरीब कुटूंबातील महिला, पुरुष, लहान मुले, म्हातारी माणसे अठराविश्वे दारिद्र्यात असून अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचीत आहे. अशा गरीब कुटूंबांना किमान शरीर निटनेटके दिसावे, त्यांना कपडे मिळावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या संकल्पनेतून जुन्या कपडयाची बँक जिल्हा बँकेने तयार केली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या घरातील छोट्या मुलांचे कपडे, महिला -पुरुष यांचे परिधान करण्यायोग्य कपडे गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरूवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत: घरचे कपडे आणून या बँकेत जमा करून केले. याला जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांनी सुध्दा चांगला प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी भरपूर प्रमाणात चांगल्या दर्जाचे वस्त्र गोळा झाली आहेत.
गोळा झालेल्या कपड्यांचे चंद्रपूरातील स्वामीकृपा बहुउद्देशिय संस्था यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या आवारात २७ आॅक्टोंबरपासून कपडे वितरणाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलवरुन गोरगरीब गरजुंना कपडे वितरीत करण्याचे जनकार्य केल्या जाणार आहे.
या जनकार्यात सहकार्य करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा परिषदेने राबविलेल्या जुन्या कपड्याच्या बँकेला भेट देवून जास्तीत जास्त परिधान करण्यायोग्य कपडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)