निराधार योजनांच्या लाभासाठी वृद्ध झाले ‘निराधार’
By Admin | Updated: October 28, 2014 22:54 IST2014-10-28T22:54:34+5:302014-10-28T22:54:34+5:30
गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परित्यक्त्या, विधवा व अपगांना अर्थसाहाय्य देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु या निराधार व वृद्धांना

निराधार योजनांच्या लाभासाठी वृद्ध झाले ‘निराधार’
चंद्रपूर : गरजू, गरीब, वृद्ध, निराधार, परित्यक्त्या, विधवा व अपगांना अर्थसाहाय्य देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु या निराधार व वृद्धांना योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालय व बँकांचे उंबरठे झिजवून सुद्धा लाभ मिळत नाही. निराधार योजनेचे वृध्दच निराधार झाल्याचे चित्र तहसील कार्यालयात दिसून येत आहे.
शासनाने निराधार दुर्बल घटकांना तसेच निराधार वयोवृद्ध व्यक्तींना जीवन जगण्यासाठी बळ मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विशेष साहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना व आम आदमी विमा योजना राबवित आहे. परंतु, या लाभार्थ्यांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची बँकाकडूनच हेळसांड होत आहे. काही ठिकाणी निराधारांना अपमानास्पद वागणूकसुद्धा मिळते तर काही बँकामध्ये निराधारांचे खाते काढण्यास टाळाटाळ जात असल्याचा प्रकार सुरु आहे. एखाद्या पात्र लाभार्थ्याला लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवून सुद्धा लाभ मिळत नाही तर बोगस लाभार्थंना एजंटमार्फत तत्काळ लाभ दिला जात असल्याचा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे.
प्रत्येक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे निराधारांचे आर्थिक शोषण होत आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात निराधार समित्यांच्या बैठका होत नसल्याने लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याची स्थिती आहे. तसेच निराधार योजनांच्या कार्यालयांनासुद्धा रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.
जिल्हास्तरीय कार्यालयात निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त असून तालुका स्तरावरील कार्यालयातसुद्धा कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे निराधार योजनेच्या कार्यालयात माहितीचा अभाव असून निराधार नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. विशेष साहाय्य योजनेच्या एकूण सात योजनांपैकी बऱ्याच योजनांची माहिती ग्रामीण भागातील निराधारांना होत नसल्याने त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
अनेक तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी या योजनांकडे लक्ष देत नसल्याने लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली दलालांकडून लाभार्थ्यांची लूट केली जात आहे. याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून लाभार्थ्यांची सुरू असलेली ही लूट बिनबोभाट आजही सुरूच आहे. गरीब लाभार्थ्यांकडे आधीच पैसे नसतानाही या दलालांकडून लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे लुटले जात आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी व गरीब गरजूंना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)