शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: March 13, 2017 00:35 IST2017-03-13T00:35:09+5:302017-03-13T00:35:09+5:30
छत्तीसगड येथील माओवादी हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथील नंदकुमार देवाजी आत्राम हे शनिवारी शहीद झाले.

शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
फैरी झाडून पोलीस दलाची मानवंदना : सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर यांचीही आदरांजली
चंद्रपूर : छत्तीसगड येथील माओवादी हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथील नंदकुमार देवाजी आत्राम हे शनिवारी शहीद झाले. त्यांच्या शहीद होण्याची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. परिसरातील गावांवर शोककळा पसरली. या वीर जवानाचे पार्थीव त्यांच्या मूळगावी बोर्डा येथे रविवारी आणल्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी झालेल्या माओवादी हल्ल्यात नंदकुमार आत्राम शहीद झाले होते. सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या कारवाया सुरू असतात. यापूर्वीही माओवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे मोठे बॉम्बस्फोट घडवून काँग्रेस नेत्यांचे खून केले होते. त्यानंतरही माआवाद्यांनी अनेक घातपाताच्या कारवाया केल्या आहेत. त्यांच्याविरोधात शनिवारीदेखील केंद्रीय राखीव दलाचे जवान कर्तव्यावर असताना माओवाद्यांनी हल्ला चढविला. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात बोर्डा येथील नंदकुमार आत्राम शहीद झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव रविवारी दुपारी बोर्डा येथे आणण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, पोलिस अधिक्षक संदीप दिवान यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मंत्रीद्वयांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. (प्रतिनिधी)
शहीद स्मारक उभारणार
-सुधीर मुनगंटीवार
शहिदाच्या कुटुंबीयांना १० लाख रूपयांची मदत दिली जाणार असल्याचे यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच गावात शहिदाच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रेरणादायी स्मारक बांधणार असल्याचे ते म्हणाले. राज्य शासनातर्फे ही मदत दिली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अंत्यसंस्कारला
हजारोंची उपस्थिती
शहीद नंदकुमार आत्राम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला. तसेच अंत्ययात्रेत बोर्डासह आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गावकऱ्यांनी जड अंत:करणाने त्यांना अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी पोलिस दलाच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.