फूटपाथवरील अतिक्रमण हटवा
चंद्रपूर : तुकूम रोडवरील बियानी पेट्रोल पंप ते एसटी वर्कशॉपपर्यंत मुख्य रस्त्यावर बऱ्याच दिवसापासून मटन मार्केटचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे हा रहदारीचा परिसर दुर्गंधी व घाणीने वेढलेला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सदर मटन मार्केट इतरत्र हलविण्याबाबत नागरिकांनी निवेदन दिले, मात्र अद्यापही कारवाई झाली नाही. या प्रश्नांकडे मनपाचे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
लांब अंतरावरील बसफेऱ्यांची मागणी
जिवती : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती येथून लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. जिवती येथून यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी, नांदेड, लातूर, केरीमेरी, अदिलाबाद मार्गे कोरपना अशा बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे
सेतू केंद्रातील प्रक्रिया ठरतेय डोेकेदुखी
चंद्रपूर : नागरिकांचे कार्यालयीन कामकाज त्वरित व्हावे, या हेतूने शासनाने सर्व कार्यालयीन कामकाज संगणकीकृत केले. परंतु ही संगणकीकृत कामे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक वेळा नेटवर्क मिळत नसल्याने काम खोळंबत आहे. विशेषत: दुर्गम भागात ही समस्या नागरिकांना त्रस्त करणारी ठरत आहे.
पडोली, बंगाली कॅम्प बाजारात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर: शहरालगतच्या पडोली तसेच बंगाली कॅम्प परिसरातील बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी परिसरातील अनेक लोक मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र त्यांना बाजारातील दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.