Officers, workers should work | पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार । गडचांदूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गडचांदूर शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून ९ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील व गडचांदूर नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयासाठी कामाला लागावे, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आम्ही लढवत असून गडचांदूरच्या विकासासाठीच मते मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी गडचांदूर येथे भाजपातर्फे न.प. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या बैठकीत गडचांदूर नगर परिषद निवडणूकीतील भाजपाच्या विजयाच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्यात आले. जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारे प्रामाणिक प्रतिमेचे उमेदवार ही भारतीय जनता पार्टीची जमेची बाजू असणार आहे. गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला. या पुढील काळातही गडचांदूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा वचनबध्द असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
गडचांदूर नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकेलच या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केले. बैठकीला भाजपा नेते शिवाजी सेलोकर, नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, उपाध्यक्ष आनंदीताई मोरे, सतीश उपलंचीवार, निलेश ताजणे, संदीप शेळके, रोहन काकडे, गोपाल मालपाणी, रामसेवक मोरे, हरीश भोरे, मधुकर कोवळे, हरी मोरे, अरविंद डोहे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शिवसेना नगरसेविकाचा भाजप प्रवेश
या बैठकीदरम्यान गडचांदूर नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका चंद्रभागा कोरवते आणि शिवसेनेच्या सुनंदा पुनवटकर यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन भाजपात प्रवेश घेतला. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Web Title: Officers, workers should work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.