पीक विमा शिबिराला अधिकारी, कर्मचारीच गैरहजर
By Admin | Updated: July 29, 2015 00:51 IST2015-07-29T00:51:45+5:302015-07-29T00:51:45+5:30
२०१४-२०१५ या वर्षात पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळले असतानाच सोमवारी आवळगाव येथे ...

पीक विमा शिबिराला अधिकारी, कर्मचारीच गैरहजर
गांगलवाडी : २०१४-२०१५ या वर्षात पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळले असतानाच सोमवारी आवळगाव येथे आयोजित पीक विमा संदर्भातील शिबिराला अधिकारी व कर्मचारीच गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थितीपासून शेतकरी सुरक्षित रहावा या उद्देशाने शासनाच्या वतीने दरवर्षी पीक विमा काढला जातो. २०१४-१५ या वर्षात ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्या गेला होता. मात्र पीक विम्यातून ब्रह्मपुरी तालुक्याला वगळण्यात आले. यामुळे पीक विम्याच्या निकषाबाबत शेतकरी संभ्रमात आहे. हा संभ्रम दूर होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा या अनुषंगाने सोमवारी आवळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कृषी विभागाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात परिसरातील ११ गावातील शेकडो शेतकरी उपस्थित झाले होते. मात्र सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी एफ.डी. शेंडे, वसुली अधिकारी पी.एस. कोलते व आवळगावचे ग्राम विकास अधिकारी पी. टी. पारधी वगळता अन्य एकही अधिकारी व कमरचारी उपस्थित नव्हते.
शिबिरात उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी पीक विम्यासंदर्भात उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न केले. परंतु या संदर्भात कृषी अधिकारीच माहिती देऊ शकतात, असे कारण सांगितल्याने सर्व शेतकरी परत गेले. यानंतर दुपारी १.३० वाजता ब्रह्मपुरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. डी. कारडवार व कृषी विस्तार अधिकारी बी.एम. आत्राम शिबिरात उपस्थित झाले. परंतु, यावेळी मोजकेच शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यास सांगितले. मात्र शिबिरात एकही तलाठी उपस्थित नसल्याने सातबारा व नमूना आठ अभावी शेतकरी पीक विमा काढू शकले नाही.
शिबिरासंदर्भात कृषी विभागाने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना सूचना देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना शिबिरात उपस्थित ठेवा, असे पत्र दिल्याचे कृषी अधिकारी कारडवार यांनी सांगितले. मात्र शिबिरामध्ये कुणीच अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित न राहिल्याने प्रशासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप आक्सापूर सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष मोतीराम लोणारे, सदस्य खुशाल ठिकरे, आक्सापूर उपसरपंच योगेन्द्र गणवीर, भगवान नवघडे, आक्सापूर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष केवळराम ठिकरे यांनी केला आहे. (वार्ताहर)