आमदाराच्या आक्रमकतेने अधिकारी हादरले
By Admin | Updated: August 28, 2016 00:40 IST2016-08-28T00:40:47+5:302016-08-28T00:40:47+5:30
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

आमदाराच्या आक्रमकतेने अधिकारी हादरले
आढावा बैठक : नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य
सिंदेवाही : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मागील आठ महिन्यांपासून जनतेच्या समस्या व तक्रारींचे पत्र आणि दूरध्वनीवरून सतत येत असल्याने प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता सिंदेवाही विभागातल्या पाचही आरोग्य केंद्रात डॉक्टर व औषधाची कमतरता असल्याने रुग्णाला उपचार बरोबर मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्टर हे खासगी औषधी दुकानातून औषधी घेण्याचा सल्ला देतात. रुग्णाला पाहण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे त्वरित उपाययोजना करून समस्या मिटविण्याचे आदेश देण्यात आले.
पंचायत विभागाशी संलग्न संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिक अवगत असल्याचे दिसते. ग्रामसेवकाच्या माध्यमातून गावात शासनाच्या योजना राबविल्या जातात. पण काही महिन्यांपासून पं.स. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गावात योजनेचा अभाव दिसत असल्याने विकास थांबला आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना या सर्व समस्यांबद्दल अवगत करण्यात आले.
या व्यतिरिक्त एसटी महामंडळ विद्यार्थी पासेस व लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याबाबत चर्चा केली. तहसील विभाग, पोलीस विभाग, वन विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, रोपवन लागवड अधिकारी, राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रतिनिधींशी दीर्घ चर्चा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले. ही चर्चा करीत असताना नागरिकांसाठी आ. वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना सोडले नाही. त्यांना आक्रमकतेने प्रश्न विचारून उत्तर मागायचे. समाधान न झाल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी करीत असताना अधिकारी मात्र धसकावीत होते.
हे सर्व दृष्य पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांना १५ वर्षापूर्वीचे आमदार वडेट्टीवार असल्याचा भास होत होता. त्यावेळी ते शिवसेनेसोबत होते हे विशेष! (प्रतिनिधी)
तक्रारींचा पाऊस
विद्युत विभागाच्या अभियंत्याविरोधात तक्रारीचा पाऊस पाहून आमदार संतप्त झाले. त्यांनी वरिष्ठ अभियंत्याला दूरध्वनी करून नागरिकांच्या समस्याबद्दल अवगत केले. महावितरण दिवसरात्र भारनियमन करीत असल्याने शेतकरी मोटरपंपाद्वारे धानाला पाणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे धान मरणावस्थेला पोहोचले आहेत. तालुक्याची विद्युत व्यवस्था त्वरित योग्य पद्धतीने करावी, असा आदेश त्यांनी दिला.