पदाधिकाऱ्यांनी केला शेतकऱ्यांचा भ्रमनिराश
By Admin | Updated: March 19, 2015 00:53 IST2015-03-19T00:53:15+5:302015-03-19T00:53:15+5:30
बल्लारपूर पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने किन्ही येथे शेतकरी मेळावा तथा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

पदाधिकाऱ्यांनी केला शेतकऱ्यांचा भ्रमनिराश
कोठारी : बल्लारपूर पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने किन्ही येथे शेतकरी मेळावा तथा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन व त्यांनी दिलेल्या तारखेप्रमाणे नियोजन करण्यात आले. मात्र कार्यक्रमस्थळी तब्बल चार तास उशीरा पोहचल्याने मेळाव्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. शेतकऱ्यांनी मेळाव्याबाबत संताप व्यक्त करीत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
बल्लारपूर पंचायत समितीमध्ये केवळ चार सदस्य आहेत. पंचायत समितीचा कारभार या सदस्यांना विश्वासात घेतल्याशिवाय होत नाही. येथे संवर्ग विकास अधिकारीही आपल्या मर्जीप्रमाणे काम करू शकत नाही. एखादा निर्णय स्वमर्जीने घेतल्यास त्यांना पदाधिकाऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागते, असे बोलल्या जात आहे. यामुळेच त्यांनी शेतकरी मेळावा व व्याख्यानमालेसाठी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले. किन्ही येथे कार्यक्रमाचा मुहूर्त ठरविला. कर्मचाऱ्यांनी जिवाचे रान करीत कार्यक्रमासाठी जाऊन शेतकऱ्यांना उपस्थिती राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी विनंती केली. कार्यक्रम दिनी सकाळी १० वाजतापासून तालुक्यातील शेतकरी किन्ही येथे पोहचले.
ढगाळ वातावरण असूनही पिकांची तमा न बाळगता मेळाव्यास शेकडो शेतकरी वेळेवर पोहचले आणि नियोजित पाहुणे मंडळीची प्रतिक्षा सुरू झाली. एक-दोन नव्हे तर, तब्बल चार तास उशिराने पाहुणे घटनास्थळावर पोहचले. जमलेले शेतकरी डोळ्यात तेल घालून या पाहुण्यांची प्रतिक्षा करू लागले. अनेक शेतकऱ्यांनी कार्यक्रम सुरू करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी भुजंग गजभे यांना विनंती केली. मात्र जोपर्यंत पदाधिकारी येत नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरू होणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली. शेतकऱ्यांना नाराज करणे शक्य मात्र पदाधिकाऱ्यांची नाराजी कशाला ओढावून घ्यायची, याच विचारात ते होते.
तालुक्यातील शेतकरी, मजूर, कामगार आदी मतदारांनी मोठ्या विश्वासाने या पदाधिकाऱ्यांना निवडून पंचायत समितीमध्ये पाठविले. मोठ्या आशेने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र निवडून गेल्यानंतर पदाधिकारी शेतकऱ्यांना विसरले. त्याचा प्रत्यय किन्ही येथील शेतकरी मेळाव्यात आला.
स्वत: कार्यक्रमाची वेळ, दिनांक ठरवायचे व वेळेवर दूसरा कार्यक्रम करण्यात व्यस्त राहायचे व नियोजित कार्यक्रमात तब्बल चार तास उशिरा पोहचून कर्तव्य दक्षतेचा परिचय देण्याचे काम करण्यात आले. मात्र कार्यक्रमात उशिरा पोहचल्याचे भानही त्यांना नव्हते. उपस्थित शेतकऱ्यासमक्ष दिलगिरी व्यक्त करण्यात त्यांना कमीपणा वाटला.
शेतकऱ्यांना विविध योजनांची, आधूनिक शेती व शेती व्यवसायाला जोड धंदा करून सेंद्रीय शेती करण्याकरिता शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा मेळावा व व्याख्यानमाला पदाधिकाऱ्यांच्या लेटलतिफशाहीने उधळला गेला. कार्यक्रमासाठी शासनाचा निधी अकारण खर्च झाला. केवळ तीस ते चाळीस शेतकऱ्यांच्या उपस्थितीत थातूरमातूर पद्धतीने विना प्रबोधनाने शेतकरी मेळाव्याची सांगता झाली. (वार्ताहर)