कृषी विज्ञान केंद्राचे कार्यालय झाले शोभेची वास्तू
By Admin | Updated: June 26, 2016 00:41 IST2016-06-26T00:41:35+5:302016-06-26T00:41:35+5:30
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे २००४ पासून नियमित कृषी विज्ञान केंद्र सुरु आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे कार्यालय झाले शोभेची वास्तू
संबंधित विभागाचे दुर्लक्ष : विज्ञान केंद्रातील १३ पदे रिक्त
सिंदेवाही: अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे २००४ पासून नियमित कृषी विज्ञान केंद्र सुरु आहे. मात्र हे कृषी विज्ञान केंद्र शोभेची वास्तू ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतावर चाचणी प्रयोग घेणे, शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्यक्षिक राबविणे, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, युवकांना, ग्रामीण महिला तसेच विस्तार कर्मचाऱ्यांना शेतीबाबत शास्त्रीय व तांत्रिक प्रशिक्षण देणे, उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर नसल्यास त्यामधील त्रुटी दूर करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचे व शेतीवर अवलंबून असणाऱ्या राहणीमानात सुधारणा करणे हा कृषी विज्ञान केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्हा आहे. सदर कृषी विज्ञान केंद्रामध्ये १६ पदे मंजूर असून १३ पदे रिक्त आहेत. सध्या या केंद्रावर एक कार्यक्रम समन्वयक एक सहायक प्राध्यापक, विषयतज्ज्ञ, दुग्धशास्त्रज्ञ, कृषी विद्या, कीटकशास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिक ही महत्त्वाची पाच पदे तसेच एक सहाय्यक (कॉम्प्युटर), एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक व्यवस्थापक एक कार्यालय अधीक्षक एक स्टेनोग्राफर, दोन वाहन चालक मिळून एकूण १३ पदे रिक्त आहेत. सध्या या केंद्रात एक लिपीक व दोन शिपाई कार्यरत आहेत. येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. पोतकीले यांची बदली कृषी संशोधन केंद्रामध्ये झाली आहे. त्यामुळे येथील कार्यालयीन कामे प्रभावित झाली आहेत. तसेच या केंद्राचा पीक संग्रहालय, फळरोपवाटिका, फूल शेती फळबाग लागवड, शेततळे, बिजोत्पादन, लाख उत्पादन, या विषयावर शेतकऱ्यांच्या शेतात जावून प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. या केंद्रात विषयतज्ज्ञ नसल्यामुळे सध्या तरी कृषी विज्ञान केंद्राचे कामकाज प्रभावित झाले आहे. तसेच मानव विकास अंतर्गत फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत तज्ज्ञ अधिकारी नसल्यामुळे तीन वर्षापासून फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा बंद आहे. या प्रयोगशाळेची दोन वाहने सध्या कार्यालयासमोर धुळ खात पडून आहे. लाखो रुपये खर्च करुन कृषी विज्ञान केंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली आहे. अनेक पदे रिक्त असल्यामुळे सध्यातरी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यालय शोभेची वास्तू झाले आहे. अकोला कृषी विद्यापीठाने रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी सिंदेवाही तालुका विकास संघर्ष समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे. (पालक प्रतिनिधी)