राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा
By Admin | Updated: August 22, 2016 01:49 IST2016-08-22T01:49:15+5:302016-08-22T01:49:15+5:30
पोलीस स्टेशन वरोराच्या आवारात नष्ट करण्यात आलेली दारू वरोरा शहरातील एका भंगार व्यवसायिकाकडे आढळून आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा
वरोरा पोलिसांची कारवाई : नष्ट केलेल्या दारूला पाय फुटले
वरोरा : पोलीस स्टेशन वरोराच्या आवारात नष्ट करण्यात आलेली दारू वरोरा शहरातील एका भंगार व्यवसायिकाकडे आढळून आली. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यावर अवैध दारू प्रकरणी पहिलाच गुन्हा दाखल झाल्याचे मानले जात आहे.
वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात काही दिवसांपूर्वी परवानगीने लाखो रुपयांची देशी व विदेशी दारू नष्ट करण्यात आली. ही दारू नष्ट करताना पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी व कर्मचारी पंचासमक्ष दारू नष्ट करीत असतात परवानगी दिलेली संपूर्ण दारू नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. सर्वकाही सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर नष्ट करण्यात आलेल्या देशी व विदेशी दारूपैकी काही दारू वरोरा शहरातील यात्रा रोड लगतच्या भंगार दुकानात आढळून आली.
चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकल्यावर गौडबंगाल उघडकीस आले. त्यानंतर भंगार व्यवसायिकास अटक करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही विभागाकडून कमालीची गुप्तता पाळली जात होती. परंतु नष्ट केलेल्या दारूला पाय फुटल्याची चर्चा सुरू झाली. एलसीबीच्या धाडीनंतर अटक करण्यात आलेल्या भंगार व्यवसायिकाने आपण राज्य उत्पादन शुल्क अधिकारी भिमराव पाटील यांना २० हजार रुपये देवून दारू खरेदी केल्याचे आपल्या बयानात नमूद केले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी भिमराव पाटील यांच्या विरोधात वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)