जिल्हा परिषदेच्या १०४ शिक्षकांना मिळाली समुपदेशातून पदस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:31 IST2019-06-29T22:31:11+5:302019-06-29T22:31:25+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या जिल्हा परिषदेच्या ८२ आणि आंतर जिल्हा बदलून आलेल्या ६२ अशा एकूण १०४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये काही शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काहींना पसंतीचे गाव मिळाल्याने त्यांच्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या १०४ शिक्षकांना मिळाली समुपदेशातून पदस्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या जिल्हा परिषदेच्या ८२ आणि आंतर जिल्हा बदलून आलेल्या ६२ अशा एकूण १०४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये काही शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काहींना पसंतीचे गाव मिळाल्याने त्यांच्यात आनंद व्यक्त केला जात आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या केल्या जात आहेत. मागील महिनाभर ही प्रक्रिया सुरू होती. आठ दिवसापूर्वी बदलीपात्र शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले. मात्र या दरम्यान ८२ शिक्षक विस्थापित झाले होते. त्यामुळे त्या शिक्षकांना पदस्थापना कधी मिळणार याकडे विविध शिक्षक संघटनांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, २६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने समुपदेशनातून बदल्याची ही कार्यवाही पूर्ण केली. यावेळी विस्थापित ८२ शिक्षकांसह ६२ आंतर जिल्हा बदलीपात्र शिक्षक आणि गतवर्षी मे २०१८ मध्ये राबविण्यात आलेल्या बदली प्रक्रियेत विस्थापित तसेच रॅन्डम राऊंडमध्ये बदली झालेले शिक्षक याशिवाय मे-जून २०१९ मध्ये राबविण्यात आलेल्या आॅनलाइन बदली प्रक्रियेदरम्यान पती-पत्नी एकत्रीकरण संवर्गात बदली झालेले परंतु पदस्थापनेत पती-पत्नीमध्ये ३० किमीपेक्षा अधिक अंतर असलेल्या शिक्षकांच्याही विनंती बदल्या करण्यात आल्या. या संवर्गात पाच महिला शिक्षकांच्या बदल्याचे आदेश काढून त्यांना पदस्थापना देण्यात आली. यावेळी उपशिक्षणाधिकारी किशोर काळे यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. दरवर्षी शिक्षण विभागातील बदल्या चर्चेचा विषय असतो. अनेकवेळा काही शिक्षक संघटना आंदोलनसुद्धा करतात. मात्र यावर्षी शांततेत सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्या.
रूजू होण्याचे आदेश, प्रतिवेदन सादर
गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. या शिक्षकांना शुक्रवारी संबंधित पंचायत समितीमध्ये रूजू प्रतिवेदन सादर करून शाळेवर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.