साथीच्या आजाराला मनपाचे पाठबळ

By Admin | Updated: November 13, 2014 22:58 IST2014-11-13T22:58:49+5:302014-11-13T22:58:49+5:30

सध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात

Nuptial support to pandemic illness | साथीच्या आजाराला मनपाचे पाठबळ

साथीच्या आजाराला मनपाचे पाठबळ

‘ती’ वाहनेही गायब : घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले
रवी जवळे - चंद्रपूर
सध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात असतानाही घाणीचा विळखा सुटू शकला नाही. मनपाने कचरा उचलण्याचे कंत्राट दिले, मात्र कचरा उचलला जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कंत्राट दिले. परंतु तेही सुरू होऊ शकले नाही. एकूणच घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडून चंद्रपुरात डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. साथीच्या आजाराला मनपा जणू पाठबळच देत आहे, हे यावरून दिसून येते.
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक जणांना डेंग्यू, मलेरिया यासारख्या डासांपासून पसरविणाऱ्या आजाराने ग्रासले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी खासगी रुग्णालयात अनेक जण उपचार घेत आहेत. गावागावात, शहरात पसरलेली अस्वच्छताच याला कारणीभूत आहे, हेदेखील निर्विवाद सत्य आहे. असे असतानाही स्वच्छतेबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती उदासीन का, हे समजेणासे झाले आहे.
ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृतीचा अभाव आहे. मात्र चंद्रपूरसारख्या शहरातही अशीच परिस्थिती राहावी, याचे आश्चर्य वाटते. शहराची स्वच्छता अबाधित रहावी व शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी महानगरपालिकेकडून लाखोंचा खर्च केला जात आहे. शहरातून दररोज कचरा उचलून तो डम्पींग यार्डमध्ये टाकण्यासाठी नागपूर येथील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. कंत्राट दिल्यानंतर काही महिन्यात या कंपनीने अटी व शर्थीनुसार नवीन कोरी वाहने आणली. प्रारंभी कचरा उचलण्याचे काम निट सुरू राहिले. मात्र कालांतराने गल्लीबोळात दिसणारी कचरा उचलणारी ही वाहने कमी होत गेली. मागील एक दोन महिन्यात कचरा उचलण्याच्या कामात चांगलीच अनियमिता आली आहे. सध्या तर अनेक वार्डात कचरा दोनदोन दिवस पडून असलेला दिसतो. कचरा उचललाही तरी तो नीट उचलला जात नाही. त्यामुळे चंद्रपुरातील अनेक वार्डात सध्या डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे.
गावात स्वच्छता असली की गावाचे सौंदर्य वाढते. गावात निटनेटकेपणा येतो. शिवाय गावाचे आरोग्यही सुदृढ असते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला स्वच्छतेचा कानमंत्र दिला. मात्र चंद्रपूरसारख्या शहरात याला हरताळ फासला जात आहे. ठिकठिकाणी कचरा पडून असलेला दिसतो. परिणामी चंद्रपुरातही साथीचे आजार असेच फोफावत राहणार काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title: Nuptial support to pandemic illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.