आता मंचावरून ज्ञानार्जनाचे कार्य सुरू - सुधीर मुनगंटीवार
By Admin | Updated: March 1, 2016 00:42 IST2016-03-01T00:42:24+5:302016-03-01T00:42:24+5:30
कर्मयोगी बाबा आमटे व पु.ल. देशपांडे यांनी झाडाचे फुले तोडू नका असा संदेश देशपातळीवर पोहचविला. हा संदेश तेवत राहो, ...

आता मंचावरून ज्ञानार्जनाचे कार्य सुरू - सुधीर मुनगंटीवार
वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे व पु.ल. देशपांडे यांनी झाडाचे फुले तोडू नका असा संदेश देशपातळीवर पोहचविला. हा संदेश तेवत राहो, याकरिता मंचावरील पाहुण्यांना पुष्पगुच्छा ऐवजी पुस्तक भेट देण्यात येत आहे. पाहुणे मंचावर पुस्तकाचे वाचन करीत असल्याने आता मंचावर ज्ञानार्जनाचे कार्य युती शासनाच्या काळात सुरू झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याच्या समारोप प्रसंगी शनिवारी केले.
दोन दिवसीय माजी विद्यार्थी मेळाव्याचा समारोप महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी मंचावर ना. सुधीर मुनगंटीवार, सिजेंटा फाऊन्डेशनचे पार्षदास गुप्ता, नामदेव डाहुले, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मंचावर दोन ते तीन तास बसत असतात. त्यांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर त्यातील फुलांच्या पाकळ्या मोडत असतात. फुले ही झाडालाच चांगली दिसतात. त्याचा दुरूपयोग होत असल्याने आता पाहुण्यांना पुष्पगुच्छा ऐवजी पुस्तके भेट देवून सत्कार करीत आहे. कार्यक्रम सुरू असताना प्रमुख पाहुणे पुस्तके वाचून ज्ञानात भर पाडीत असल्याने आनंद होतो, असे सांगून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्यासाठी उद्योग उभारा व शेतकऱ्यांना शेतात जावून मदत करा, असे आवाहन केले.
याप्रसंगी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आढावा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नाहीस त्या कुष्ठरोग्यांनी महाविद्यालयाची इमारत बांधुन हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. त्यामुळे हे जगातील एकमेव महाविद्यालय असल्याची ग्वाही डॉ. विकास आमटे यांनी दिली. याप्रसंगी माजी विद्यार्थी मारोतराव वरभे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी केले. संचालन प्रा. राहुल तायडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. मनोज जोगी यांनी मानले. हर्षदा पोतदार यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला सुधाकर कडू, कौस्तुभ आमटे, गौतम करजगी, डॉ. विजय पोळ, निवृत्त प्राचार्य एम.वाय. पारालपवार, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त, सेवानिवृत्त प्राध्यापक, प्राध्यापक, माजी विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)